जाणून घ्या, शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

सामना ऑनलाईन । मुंबई

बऱ्याचदा उत्तम टाईमपास म्हणून शेंगदाणे खाल्ले जातात. थंडीच्या दिवसात शेंगदाणे खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असतं. शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असतात. त्यामुळेच शेंगदाणे प्रोटीनसाठी सर्वात स्वस्त वनस्पती स्रोत मानले जातात. मुठभर शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात कॅलरीज,कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असतात. तसेच शेंगदाण्यापासून व्हिटॅमिन इ, के, आणि बी६ भरपूर प्रमाणात मिळतात. शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक आजारांपासून बचाव करण्याऱ्या शेंगदाण्यांचे फायदे ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

आठवड्यातले काही दिवस शेंगदाणे खाल्ल्यास हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी राहतो. तसेच शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होऊन ते नियंत्रणात राहते. शेंगदाण्य़ांमध्ये व्हिटॅमिन इ मोठ्या प्रमाणात असल्याने शेंगदाणा उपयुक्त अँटीऑक्सिडंटचा मोठा स्त्रोत आहे. हृदयाला संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी हे अँटीऑक्सिडंट महत्त्वाचे ठरतात. शेंगदाण्याचे नियमित सेवन गर्भवती स्त्रियांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. गर्भावस्थेत बाळाच्या विकासासाठी शेंगदाणे फायदेशीर ठरतात.

शेंगदाण्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास पचनशक्ती वाढते आणि भूक न लागण्याची समस्याही दूर होते. शेंगदाण्यामध्ये ओमेगा-६ फॅटसुद्धा भरपूर प्रमाणात आढळतात. चांगल्या त्वचेसाठी ते अत्यंत फायदेशीर आहेत. त्यामुळेच शेंगदाणे त्वचेसाठी उत्तम मानले जातात. शेंगदाणे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे दररोज योग्य प्रमाणात शेंगदाणे खाणे शरीरासाठी उपयुक्त आहे. शेंगदाण्याचे जसे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहे. अतिप्रमाणात शेंगदाण्याचं सेवन केल्यास ते शरिरासाठी धोकादायक ठरू शकतं. जास्त शेंगदाणे खाल्ल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.