तलम मुलायम उन्हाळी कपडे

पूजा पोवार, फॅशन डिझायनर

मऊ… तलम कपडे उन्हाळ्यात सगळ्यांनाच हवेहवेसे…मग आपल्या घरातील आजी-आजोबांची तर ती पहिली आवश्यकता. आजीच्या मऊ वायलच्या साडीच्या गोधडीचा स्पर्श आठवतोय का… ती साडी जेवढी धुतली जाईल तितका तिचा स्पर्श अगदी कापसासारखा…रंगसुद्धा तसेच…सतेज…डोळ्यांना सुखावणारे…उन्हाळ्यासाठी अगदी आल्हाददायक…

काळ बदलला…काळानुरुप फॅशनही बदलली…त्यानुसार आपल्या आजी-आजोबांनीही फॅशनेबल होणं अपरिहार्यच ठरलं. आपल्या घरातील आजीच्या वायलच्या साड्या थोड्या मागे पडून सध्या त्यांची जागा लिननच्या आधुनिक कुत्र्यांनी घेतली आहे. ब्रिटिशांच्या काळात आपल्या देशात आलेल्या लिननच्या कापडाने सुती कपड्यात मानाचे स्थान पटकावले आहे. वापरायला, घालायला सुटसुटीत अगदी आपल्या आजी-आजोबांसारखेच रुबाबदार… लिननच्या कपड्यांमध्ये लिनन ब्लेंड, कॉटन ब्लेंड, कॉटन मल असे कपड्यांचे प्रकार आहेत. लिननमधील विविध फॅशनचे कपडे सध्या बाजारात विक्रीकरिता उपलब्ध आहेत.

लिननची वैशिष्ट्ये

जगातील सगळ्यात स्ट्राँगर फॅब्रिक यान हे लिननचं मानलं जातं. त्यामुळे लिननला घरगुती वापराकरिताही प्राधान्य आहे. उदा. बेडशिट, टॉवेल, नॅपकिन यामध्ये कॉटनपेक्षा लिननचं प्रमाण जास्त आहे.

लिननचा टिकाऊपणा जास्त आहे.

पैशांमध्येही काही प्रमाणात लिननचा वापर केला जातो, असे म्हटले जाते.

लिननच्या कपड्याचा यान खूप मोठा असतो त्यामुळे बेडशिटसारख्या मोठ्या कपड्यांकरिता लिनन वापरात येते.

फॅब्रिकमध्ये नैसर्गिकत: लिंगनम नावाचं फायबर असतं. ते कडक असतं म्हणून लिनन लगेच चुरगळतं, पण ते जसजसं जास्त वापरात येईल तसतसं अधिकाधिक मऊ होत जातं.

मऊपणामुळे घाम टिपण्याची क्षमता लिननमध्ये जास्त असते.

ब्रिटिशांच्या काळात लिनन युरोपात आले आणि बेलफास्ट हे लिननचे मध्यवर्ती केंद्र बनले. लिननचे कापड थंड असते, त्वचेला त्याचा मुलायम स्पर्श जाणवतो. त्यामुळे ब्रिटिश काळात उच्चवर्गीय लोक हे कापड बेडशिटसाठी वापरत. त्यानंतर लिननच्या दर्जाबरोबर त्याचा वापर वाढत गेला.

लिनन कसे वापरावे

उन्हाळ्यात लिननचे कपडे निवडताना फिक्टर पिस्टल, पांढरा, तसेच गुलाबी, हिरवा,फिक्कट करडा हे रंग निवडावेत. लिनन आपण सहजपणे घरी धुऊ शकतो. उन्हाळ्यात घामाचे डाग या कपड्यांवर पडले तरी ड्रायिंक्लनिगला टाकण्याची गरज नसते. थंड पाण्यात हलक्या हाताने हे कपडे धुतले तरी स्वच्छ होतात.

फॅशनचे प्रकार

स्लिव्हलेस कुर्ता, ओपन गळ्याचे कुर्ते, लिननमध्ये आणि कॉटनमधील ड्रेसेस, वन पिस, पेन्सिल कट पॅण्ट विशेष म्हणजे या कपड्यांमध्ये डोळ्यांना थंडावा देणारे पांढरा, क्रिम, फिकट गुलाबी असे अगदी लाईट रंग वापरले जातात. याशिवाय कॉटन साडी, लिनन साडी, कॉटनमधले वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार आणि पुरुषांकरिता लिनन शर्ट-पँट, हाफ शर्ट, सेमी लाँग कुर्ता, इत्यादी कपड्यांचा ट्रेण्ड सध्या सुरू आहे. हे कपडे परिधान केल्याने स्त्री-पुरुष स्टायलीश दिसतातच शिवाय त्यांचं व्यक्तिमत्त्वही सुंदर दिसतं. या कपड्यांची रेंज ५०० रुपयांपासून हजारांपर्यंत आहे. पूर्वी लिनन महाग असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक याकडे वळत नव्हता. पण, आता ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहे. त्यामुळे लिननची मागणी वाढली आहे.