महामार्गावर शतप्रतिशत दारूबंदी

27

सामना ऑनलाईन । दिल्ली

महामार्गांपासून ५०० मीटरच्या आत दारूविक्रीला घातलेली बंदी ही केवळ वाईन शॉपपुरतीच मर्यादित नाही. बार, रेस्टॉरंट, पब यांनाही ती लागू आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले.
महामार्गापासून दारूची विक्री नजरेच्या टप्प्यात असताच कामा नये, या हेतूने सर्वोच्च न्यायालयाने १५ डिसेंबर २०१६ रोजी महामार्गांपासून ५०० मीटरच्या आत दारूविक्रीवर बंदी घातली. त्याची अंमलबजावणी उद्या १ एप्रिलपासून देशभरात सर्वत्र सुरू होत आहे.
बार, रेस्टॉरंट, पब यांना या बंदीतून वगळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अधिपत्याखालील खंडपीठाने निक्षून सांगितले.

बंदी आदेशात दुरुस्ती
– आपल्या आधीच्या बंदी आदेशात सर्वोच्च न्यायालयाने आज दुरुस्ती केली. २० हजार किंवा त्याहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महामार्गापासून दारूची दुकाने २२० मीटरपर्यंतच्या अंतरावर असण्यास न्यायालयाने आता मुभा दिली आहे. मात्र इतर ठिकाणची ५०० मीटरच्या आत असलेली दारूची दुकाने उद्यापासून बंद करावीच लागणार आहेत.
– २२० मीटर अंतराचा हा निकष सिक्कीम, मेघालय, हिमाचल प्रदेश या डोंगराळ राज्यांनाही लागू राहील. ही डोंगराळ राज्ये आणि २० हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या शहरांना वगळता सर्वत्र महामार्गापासून ५०० मीटरच्या आत दारूच्या दुकानांना करण्यात आलेली मनाई कायम राहणार आहे.
– १५ डिसेंबर २०१६ रोजीचा मनाई आदेश लागू होण्याआधी मंजूर झालेले दारूच्या दुकानांचे परवाने सप्टेंबर २०१७ पर्यंत वैध राहतील, असे खंडपीठाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या