दारू चोरांच्या मोठ्या टोळीला ३ तासात जेरबंद करणाऱ्या पोलिसांना बक्षीस

सामना ऑनलाईन, बुलडाणा

अत्यंत सराईतपणे दारूच्या गोडाऊनवर दरोडा टाकून दारूचा सगळा साठा पळवून नेणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी चोरी केल्यानंतर अवघ्या काही तासात अटक केली. याबद्दल या पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यांनी २ हजार रूपयांचं बक्षीस देऊन कौतुक केले.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमधील उस्मानाबाद बागामध्ये एका दारूच्या गोडाऊनवर दरोडा घातला. गोडाऊनच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करून त्याचे हातपाय बांधून कोपऱ्यामध्ये फेकून दिला. यानंतर दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडून टाकले त्यानंतर गोडाऊनच्या दाराजवळ ट्रक उभा करून दारूचा सगळा साठा त्यात भरून पोबारा केला. मात्र ३ पोलिसांच्या एका तुकडीने मातनी गावाजवळ हा ट्रक अडवला. पोलिसांना बघून जवळपास ८ दरोडेखोरांनी जंगलात पळ काढला, पोलीस त्यांच्या मागावर निघाले, दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली मात्र तरीही पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला अखेर या दरोडेखोरांना अटक करण्यात आली.  पोलिसांच्या या कामगिरीचं पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक यांनीही कौतुक केलं आहे.