का केलं ‘सामना ऑनलाईन’ने मेघा धाडेचं फेसबुक लाईव्ह रद्द?

सामना ऑनलाईन, मुंबई

‘बिग बॉस मराठी’ची विजेती मेघा धाडे यांचे सामना ऑनलाईनवर फेसबुक लाईव्ह शनिवारी दुपारी १२ वाजता ठेवण्यात आले होते. मात्र छान-छान, गोड-गोड प्रश्न विचारणार नसल्यास मी या लाईव्हसाठी येणार नाही, असा निरोप मेघा धाडे यांच्याकडून आला. ही अट मान्य नसल्याने सामना ऑनलाईनने हे फेसबुक लाईव्ह रद्द करण्याचं ठरवलं आहे.

या फेसबुक लाईव्हबाबत लोकांना कळावे, त्याची प्रसिद्धी व्हावी यासाठी एक ३१ सेकंदाची चित्रफीत बनवण्यात आली होती. ही चित्रफीत प्रसारित करण्यापूर्वी मेघा धाडे यांना व्हॉटसअॅपवर पाठवण्यात आली होती. संकेतानुसार यामध्ये काही आक्षेपार्ह वाटल्यास सांगा ते बदल करू असंही सामना ऑनलाईनतर्फे सांगण्यात आलं. यावर काही मिनिटांमध्ये एक बदल करण्यासाठी मेघा यांच्याकडून विनंती करण्यात आली. त्यानुसार बदल करून पुन्हा ती चित्रफीत मेघा यांना पाठवण्यात आली. मात्र ठराविक अंतराने ”ही चित्रफीत चांगली वाटत नाही, फारच नकारात्मक वाटते, ती मला आवडलेली नाही. मी जर तुमच्या कार्यालयात लाईव्हसाठी यावं अशी इच्छा असेल तर चांगली आनंदी चित्रफीत बनवा” असे मेसेज पाठवण्यात आले.

वारंवार सुचवण्यात आलेले हे बदल करणं आणि ती चित्रफीत वेळेत लोकांपर्यंत पोहोचवणं शक्य नसल्याने ती न वापरण्याचा सामना ऑनलाईनने निर्णय घेतला. बोचणारे प्रश्न अपेक्षित असल्याने मेघा यांनी मुलाखत गोडगुलाबी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. मात्र तिची ही इच्छा पूर्ण करू शकत नसल्यानेच ही मुलाखत सामना ऑनलाईनने रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत मेघा धाडे यांना व्हॉटसअॅपद्वारे कळवण्यातही आले आहे.