तीन तलाकचं काय होणार? सरकारला रोखण्यासाठी विरोधकांचा गोंधळ

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज राज्यसभेत अत्यंत महत्वाचं असं तीन तलाकचं विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकात सुधारण करून त्याला मंजुरी दिली आहे. आता सुधारणा करण्यात आल्यानंतर तरी राज्यसभेत हे विधेयक मंजूर होणार का याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

शुक्रवारी राज्यसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी राफेलच्या मुद्द्यावर गोंधळ घातला. तसंच तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी आक्षेप घेतला. शुक्रवारी संसदेत खासगी विधेयकांवर चर्चा होते, अशा वेळी सरकार तीन तिलाक विधेयक कसं काय सादर करू शकते?. त्यांच्यासह आनंद शर्मा आणि रामगोपाल यादव यांनी देखील हे विधेयक आज मांडण्यास विरोध केला आहे.

triple-talaq

दरम्यान, या विधेयकासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी संसदीय कार्य मंत्री अनंत कुमार यांच्या कार्यालयात एक बैठक बोलावली. ज्यामध्ये अमित शहा, अनंत कुमार यांच्याशिवाय रविशंकर प्रसाद देखील उपस्थित होते. यानंतर एक सुधारित विधेयकाची कॉपी राज्यसभेतील सदस्यांना देण्यात आली.