सरकार चूकत असेल तर आसूड ओढणारच, उद्धव ठाकरे यांनी फटकारले

7

सामना ऑनलाईन, लातूर

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारवर टीकेचे जबरदस्त आसूड ओढले. लातूरातील मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख सभागृहात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. गटप्रमुखांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी होणाऱ्या विलंबाबद्दल जाब विचारला. तसेच सरकार चूकत असेल तर मी आसूड ओढणारच, अशा शब्दात त्यांनी भाजप सरकारला फटकारले.

मुख्यमंत्री दुष्काळ जाहीर करण्यासाठी कशाची वाट पाहात आहेत असा सणसणीत सवालही त्यांनी यावेळी केला. राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी उपग्रहामार्फत करणार असल्याच्या वृत्ताचा धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले की सगळं काही उपग्रहावरूनच कळत असेल तर मग उपग्रहालाच मुख्यमंत्री का बनवत नाही?, अशी टीका ही त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाची शिवसैनिकांमध्ये जबरदस्त उत्सुकता होती. लातूर शहरात त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून गटप्रमुखांना येणाऱ्या काळात आपल्याला काय करायचे आहे त्याचे व्यवस्थित मार्गदर्शन केले. लातूर विधानसभा आणि जिल्ह्यातील सगळ्या विधानसभा मतदारसंघात भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा असे सांगत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसैनिकांना धावून जाण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दुष्काळाचा प्रश्न राज्यात गंभीर बनत चालला असल्याने उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रामुख्याने हात घातला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना शहरात १५ दिवसांतून एकदा पाणी यायचे आताही परिस्थिती तीच आहे मग बदललं काय असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. नैसर्गिक दुष्काळ दूर करण्यासोबतच लातूर जिल्ह्यातील राजकीय दुष्काळही संपवण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले.

गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की “सरकारच्या योजना बंद पडायला लागल्या आहेत. तुमच्या फसव्या योजनांचा फक्त पाऊस पडला. फसव्या योजनांच्या पावसाने पाणी येत नाही” पंतप्रधान नरेंद्र मोदी साई समाधी शताब्दी सोहळ्यासाठी शिर्डीत आले होते. यावेळी त्यांनी दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. हे आश्वासन दिले मात्र आधी दुष्काळ जाहीर तरी करा असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मार्गदर्शनात राम मंदिराचा मुद्दा आणि न्यायालयाच्या हस्तक्षेपाबाबतही भाष्य केले.”नशीब दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय कोर्टाकडे ढकलला नाही” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी खोचक टीका केली. राम मंदिराचाही मुद्दा न्यायालयात आहे, जर न्यायालयाने निर्णय दिला नाही तर तुम्ही काय करणार असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला आहे. रामभक्तांना गोळ्या घातल्या, तुम्ही विसरला असाल आम्ही हे विसरलेलो नाही असं म्हणतानाच उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार असा पुनरुच्चार केला.

लातूरमध्ये आयोजित गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये शिवसेना नेते खासदार चंद्रकात खैरे, शिवसेना नेते विश्वनाथ नेरुरकर , शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार रवींद्र गायकवाड , माजी आमदार दिनकर माने, धोंडू पाटील, शंकरराव बोरकर, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह लातूर जिल्ह्यातील शिवसेना सहसंपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, महिला आघाडी जिल्हासंघटक, शिवसेना व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, गटप्रमुख, शिवसैनिकांची मोठी उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या