आदित्य ठाकरेंचे मिशन अॅडमिशन… अकरावी प्रवेशाचा प्रश्न सोडवण्यासाठी सूचवले उपाय

99
aaditya

सामना ऑनलाईन । मुंबई

अकरावी प्रवेशातील गोंधळ संपवण्यासाठी इंटर्नल मार्क्स ग्राह्य धरण्यात यावे आणि त्याच सोबत एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी तुकडी करण्यात यावी, असे दोन पर्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगितल्याची माहिती, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अकरावी प्रवेशाचा प्रश्न सोडवण्यासाठी महाविद्यालयांत जागा वाढवून देण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याचे आज सांगितले. अकरावी प्रवेशाचा प्रश्न आणि राज्यातील दुष्काळ परिस्थिती यावर मुख्यमंत्र्यांशी सकारात्म चर्चा झाल्याचे सांगतानाच कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट सांगत आदित्य ठाकरे यांनी अन्य चर्चांना पूर्णविराम दिला.

आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. या बैठकीत दोघांमध्ये काय चर्चा झाली याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’वर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अकरावी प्रवेश आणि दुष्काळ परिस्थितीवर झालेल्या चर्चेची सविस्तर माहिती दिली. एसएससी बोर्डाचा यंदा कमी लागलेला निकाल आणि त्याचवेळी सीबीएसई-आयसीएसई बोर्डांमधील विद्यार्थांना मिळालेले मार्क यात मोठी तफावत आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाचा प्रश्न किचकट बनला आहे. विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत. त्यांची चिंता दूर करण्यासाठी मी बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असे आदित्य ठाकरे म्हणाले. इंटर्नल मार्क्स यंदा ग्राह्य न धरण्यात आल्याने एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. वर्षभराच्या अभ्यासावर इंटर्नल मार्क्स दिले जातात. त्यामुळे हे मार्क्स ग्राह्य धरण्यात यावे अशी विनंती केली. एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी तुकडी करण्यात यावी, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचा प्रश्न सहज सुटेल आणि पालकांचीही चिंता मिटेल, असा पर्याय सूचवल्याचेही ते म्हणाले. हा पर्याय सूचवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा करून वेगळ्या तुकडीसंदर्भात विचार करण्यास सांगितले. या चर्चेला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

याचसोबत दुष्काळ परिस्थितीवर देखील चर्चा झाली. अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक बाबींमुळे पीक विमा मिळत नसल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिल्याचे आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आज आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने पत्रकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच पुढल्या वर्षासाठीचा संकल्प काय असे विचारले असता ‘आपल्या हातून चांगलं काम होत रहावं’ असे ते म्हणाले. राजकारणात उतरणार का या प्रश्नावर ते म्हणाले की दुष्काळ आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणे अधिक महत्वाचे आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या