नागपूरमध्ये अडवाणींचे सूचक मौन

सामना ऑनलाईन । नागपूर

नागपूरमध्ये रेशीमबाग मैदान येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते. तब्बल बारा वर्षांनी अडवाणी यांनी विजयादशमीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. शुक्रवारपासून नागपूरमध्ये असलेल्या अडवाणी यांनी सर्वच राजकीय मुद्यांवर सूचक मौन पाळले.

अडवाणी यांनी सरसंघचालक डॉ. भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केल्याचे समजते, मात्र राजकीय मुद्यावर भाष्य करणे त्यांनी टाळले. मोहम्मद अली जिना प्रकरणामुळे संघ आणि अडवाणी यांच्यात निर्माण झालेला दुरावा कमी झाला असला तरी अडवाणींची नाराजी दूर झालेली नाही.

अडवाणी यांचे शुक्रवारी रात्री नागपूरमध्ये आगमन झाले. ते वर्धमाननगरातील एका उद्योजकांच्या घरी थांबले होते. आज (शनिवारी) सकाळी साडेसात वाजता ते रेशीमबागमध्ये सुरू झालेल्या विजयादशमीच्या कार्यक्रमाला हजर होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला नाही. अडवाणी यापूर्वी प्रत्येकवेळी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारायचे. मात्र यावेळी त्यांनी पत्रकारांना टाळणे पसंत केले.