यंदाची दिवाळी काळी! आकाशकंदिलाची बत्ती गूल; लोडशेडिंगचा शॉक

सामना प्रतिनिधी । मुंबई

ऐन दिवाळीतच भारनियमनामुळे राज्यातील आकाशकंदिलांची बत्ती गूल झाली आहे. अपुऱ्या कोळशामुळे विजेची निर्मिती घटलेली असतानाच ऑक्टोबर हीटमुळे विजेची मागणी कमालीची वाढली आहे. त्यामुळे आज महावितरणने मुलुंड, भांडुपबरोबरच ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात २२०० मेगावॅटचे भारनियमन केले. भारनियमनाचा हा लपंडाव आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याने दिवाळी ‘काळी’ होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

राज्यातील महानिर्मिती, अदानी, इंडिया बुल्ससह कोळशावरील सर्वच वीज प्रकल्पांना महिनाभरापासून कोळशाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे वीजनिर्मितीत घट झाली आहे. विजेची मागणी आज महावितरणकडे १७,९०० मेगावॅट नोंदवली होती, पण केवळ १५,७०० मेगावॅटच वीज उपलब्ध झाली.

शहरी भागात दोन, तर ग्रामीण भागात आठ तास
ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर अशा शहरी भागात आज दिवसभर दोन-अडीच तासांचे टप्प्याटप्प्याने भारनियमन करण्यात आले, तर वाशिम, जळगाव, नांदेड, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ, बीड, रायगड या जिह्यांतील ग्रामीण भागात दिवसातून चार टप्प्यांत आठ-दहा तासांचे भारनियमन केले. तसेच कृषी वाहिन्यांवरील वीजपुरवठा कमी केले आहे.

विजेची उपलब्धता (मेगावॅट)
महानिर्मिती – ४६००, अदानी – १७००, रतन इंडिया – ५००, केंद्रीय प्रकल्प – ३८००, जेएसडब्ल्यू – ३००, सीजीपीएल – ५६०, एम्को – १००, उरण गॅस – ३८०, जलविद्युत प्रकल्प – १२००, आपत्कालीन – ७००