लोडशेडिंग पेटले! राज्यभरात उद्रेक!!

सामना ऑनलाईन, मुंबई

महागाईनंतर आता लोडशेडिंगचा जबरदस्त शॉक बसलेली राज्यातील जनता खवळून उठली आहे. जिह्याजिह्यांमध्ये महावितरणविरोधात उद्रेक पेटला आहे. केवळ विरोधी पक्षच नव्हे, तर भाजपातील स्वकीयांनीही लोडशेडिंगचा तीक्र निषेध केला आहे. आज संभाजीनगरात संतप्त जनतेने महावितरणच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. कार्यालयातले एसीही उखडून फेकले, तर भाजपच्याच नगरसेवकांनी महावितरणच्या अभियंत्याला घेराव घालून जाब विचारला. धाराशीवमध्ये लोकांनी कंदील लावून लोडशेडिंगचा निषेध केला.

एससीसीएल कोळसा खाणीत पडलेल्या पावसामुळे कोळसा उत्पादनावर परिणाम झाला. कोळसा कमी प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे लोडशेडिंग करावे लागत असल्याचे कारण ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढे केले आहे. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर अंधाराच्या खाईत लोटणाऱया सरकारविरोधात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. विजेअभावी शेतीची कामे खोळंबली आहेत. अंधारामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागातील जनजीवनच विस्कळीत झाले आहे. त्यामुळे लोक संतापून रस्त्यावर उतरले आहेत.

वीजचोरांसाठी प्रामाणिक ग्राहकांना १२ -१२ तास लोडशेडिंगचा त्रास का दिला जात आहे, असा सवाल करीत संभाजीनगरातील भाजपच्याच नगरसेवकांनी आपल्याच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. बजरंग चौकातील महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता जाधव यांना घेराव घालून लोडशेडिंग बंद करण्याची मागणी त्यांनी केली.

नगरमध्ये शिवसेनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अभय महाजन यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी अनिश्चित भारनियमनासह सर्व भारनियमन तत्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली.

मुलुंड, भांडुप, ठाणे, नवी मुंबईचे भारनियमन तात्पुरते मागे

महावितरणकडील विजेच्या मागणीत आज दुपारनंतर ३०० मेगावॅटची घट होऊन १७,६०० पर्यंत खाली आली, तर पुरवठय़ात १५,९०० मेगावॅटपर्यंत वाढ झाल्याने महावितरणने मुलुंड, भांडुपसह ठाणे, नवी मुंबईबरोबरच शहरी भागातील ‘अ’ आणि ‘ब’ गटातील फीडरवरचे भारनियमन तात्पुरते मागे घेतले आहे. त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

महावितरणकडे गुरुवारी सुमारे १८ हजार मेगावॅट विजेची मागणी नोंदवली गेली होती, तर विजेची उपलब्धता केवळ १५,६०० मेगावॅट होती. त्यामुळे २३०० मेगावॅटचे भारनियमन करावे लागले होते. त्याचा फटका ग्रामीण भागातील वीजग्राहकांबरोबरच शहरी ग्राहकांना बसला होता. मात्र आज विजेच्या उपलब्धतेत वाढ झाल्याने महावितरणने शहरातील भारनियमन मागे घेतले आहे, मात्र पुढे विजेची मागणी वाढली की पुन्हा सर्वत्र भारनियमन करावे लागेल अशी भीती महावितरणच्या एक अधिकाऱयाने व्यक्त केली आहे. दरम्यान, विजेची उपलब्धता कमी असल्याने राज्यभर फीडरनिहाय भारनियमन करण्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना महावितरणने अधिकाऱयांना दिल्या आहेत.

खुल्या बाजारातून वीज घेण्यास मंजुरी

महावितरणकडे पुरेशी वीज उपलब्ध नसल्याने राज्यभर भारनियमन करावे लागत आहे. त्यामुळे खुल्या बाजारातून वीज खरेदी करण्यास परवानगी मिळावी म्हणून महावितरणने वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्यानुसार आयोगाने जादा दराने खुल्या बाजारातून वीज खरेदी करण्यास आज परवानगी दिली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत आणखी ८०० मेगावॅट वीज उपलब्ध होईल असे महावितरणने स्पष्ट केले आहे.