कर्ज लाखाचे, माफी दीड रुपयाची! उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची भयंकर चेष्टा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

कर्जमाफीच्या लाटेवर उत्तर प्रदेशात सत्तेवर आलेल्या योगी सरकारने शेतकऱ्यांची भयंकर चेष्टा केली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर लाख रुपयाचे कर्ज आहे त्याला कर्जमाफी मिळाली आहे दीड रुपयाची! कर्जमाफी देण्याच्या नावाखाली सरकारने धोकेबाजी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने शेतकऱयांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. या घोषणेला भुलून उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी भाजपच्या हाती सत्ता सोपवली. कर्जमाफीची घोषणा करताना योगी सरकारने ३१ मार्च २०१६ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जेवढी थकबाकी आहे तेवढे कर्ज माफ करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या कर्जमाफीसाठी खात्यावर १ लाखांपेक्षा जास्त रक्कम असू नये अशी अट घालण्यात आली होती. प्रत्यक्षात जेव्हा कर्जमाफीचे परिणाम हाती आले तेव्हा शेतकऱ्यांवर अक्षरशः डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली.

अहेरीपूर येथील एका शेतकऱ्याने २८ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याला १ रुपया ८० पैसे कर्ज माफ झाले आहे. मुकुटपूर येथील एका शेतकऱ्याने २ लाखांपेक्षा जास्त कर्ज घेतले होते, त्याचे दीड रुपया कर्ज माफ झाले असून, महेवा येथील एका शेतकऱ्याला १८ रुपये कर्जमाफी मिळाली आहे. विशेष म्हणजे ७ सप्टेंबर रोजी राज्याचे परिवहनमंत्री स्वतंत्रदेव सिंह यांनी या शेतकऱ्यांना कर्जमाफीचे धनादेश वाटले.