लोकलमध्ये तरुणीसमोर हस्तमैथुन करणारा अखेर अटकेत

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकलच्या डब्यात तरुणीसमोर हस्तमैथुन करत तिला धमकावणाऱ्या विकृताला तब्बल महिन्यानंतर अटक करण्यात आली आहे. राजु पप्पू (१९) असं या आरोपीचं नाव असून त्याला बोरीवली स्थानकातून अटक करण्यात आली.

तरुणीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी छेडछाडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तपासाअंती हा आरोपी व्यसनी असून त्याचा कोणताही निश्चित ठावठिकाणा नाही असं समोर आलं. त्यानुसार तीनही रेल्वेमार्गांवर तसेच मुंबईतील अन्नछत्रं, भंडाऱ्यांची ठिकाणे, चौपाट्या, फुटपाथ अशा निरनिराळ्या ठिकाणांवर शोध घेण्यात आला. अखेरीस २० ऑगस्ट रोजी हा आरोपी बोरीवली स्थानकात फिरत असताना त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबूली दिली.

मे महिन्याच्या २४ तारखेला सदर तरुणी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास बोरीवलीहून चर्चगेटच्या दिशेने प्रवास करत होती. महिला डब्याला लागून असलेल्या विकलांग डब्यात हा आरोपी चढला आणि त्याने या तरुणीसह डब्यातील इतर महिलांना शिवीगाळ करत त्यांच्या समोरच हस्तमैथुन करायला सुरुवात केली. त्याचे विकृत चाळे पाहून या तरुणीने त्याचा फोटो काढला. ही लोकल कांदिवली स्थानकात दाखल होताच हा आरोपी डब्यातून उतरून महिलांच्या डब्याजवळ आला. त्याने तरुणीला बलात्काराची धमकीही दिली. या तरुणीने आपल्यासोबत घडलेली घटना १० जुलै रोजी आरोपीच्या फोटोसह सोशल मीडियावर पोस्ट केली होती.