भाजप-शिवसेना युतीने आघाडीला लावला सुरुंग, सुजय विखेंना निवडून आणण्याचा निर्धार

2

सामना प्रतिनिधी । नगर

नगर दक्षिण मतदार संघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे यांना पक्षामध्ये घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला खिंडार पाडण्यास सुरुवात केली. आघाडीला पडलेले भूकंपाचे धक्के हे दिल्लीच्या तख्तापर्यंत गेल्याने आघाडी हतबल झाली, अशी टीका करुन आता कुणाची यंत्रणा याचा विचार न करता तीनही यंत्रणा म्हणजे, भाजप-सेना-विखे एकत्र आल्याने विखेंना सर्वाधिक मतांनी निवडून आणणारच असा निर्धार पालकमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीच्या मेळाव्यात राज्यात सर्वाधिक मतांनी विखेंना निवडून आणणारच असे, युतीच्या नेत्यांनी निर्धार करत लोकसभा निवडणूकीचे रणसिंग फुंकले.

रविवारी नगर येथे शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पालकमंत्री प्रा.राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, आ.मोनिकाताई राजळे, आ.बाळासाहेब मुरकुटे, आ. विजय औटी, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणसाहेब शेलार, प्रदेश सदस्य अभय आगरकर, माजी आमदार चंद्रशेखर कदम, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे यांसह महायुतीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री राम शिंदे म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात धक्के बसले आहे. मोहिते-पाटील सुद्धा आता भाजपात आले आहे. राज्यात व देशात वातावरण बदल झाला आहे. त्यामुळे सर्वांच्या लक्षात आलेला आहे. भूकंपाचे लहरी दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचले आहेत. आता काँग्रेस-राष्ट्रवादी मेटाकुटीला आले आहे. या निवडणुकीमध्ये केंद्र व राज्य सरकारने केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहचवून देशात पुन्हा भाजपाची सत्ता आणुन नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे, त्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करा. कोणाच्या यंत्रणेची कोणाला गरज आहे, नाही हे पाहू नका. तिन्ही यंत्रणा एकत्र आलेल्या आहेत. आपल्याला सुजय विखे यांना सर्वाधिक मतांनी निवडून आणायचे असून, असेही ते म्हणाले.