Lok sabha 2019 – मोहीम फत्तेचा विडा कोणीच उचलेना, राष्ट्रवादीने सोनवणेंना बाशिंग बांधले

उदय जोशी । बीड

बीड लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीने भलता सस्पेन्स ठेवला. कोण … कोण… कोण उमेदवार कोण … उत्सुकता शिगेला पेटली. जयश्री धनंजय मुंडे की अमरसिंह पंडित याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असताना पक्षाने जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना उमेदवारी घोषित केली आणि खुद्द राष्ट्रवादीनेच लोकसभा निवडणुकीतील हवा काढून घेतली. दोन जिल्हापरिषद गटामध्ये प्राबल्य असणारा नेता लोकसभा निवडणुकीत सहा लाख मताने विजय मिळवलेल्या भाजपा उमेदवाराचा सामना करेल या बाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.

बीड लोकसभा निवडणुकीत तगडी लढत अपेक्षित होती. विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांच नाव जवळपास निश्चित झाले होते. अचानक धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या नावाची चर्चा जोर धरू लागली. अमरसिंह पंडित काय आणि राजश्री मुंडे काय दोन्ही तगडे उमेदवार होते. लढत राज्यात गाजणारी होती. राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल याकडे जिल्ह्यासह मराठवाड्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादीने उमेदवार घोषित करताना मोठा सस्पेन्स ठेवला. आज दुसऱ्या यादीत बीडचा उमेदवार घोषित केला गेला. जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली गेली, नव्हे त्यांच्यावर लादली गेली. कारण लोकसभा निवडणुकीसाठी समोर येणारी नावे मोठी होती मात्र त्यांची ईच्छा शक्ती नव्हती. अमरसिंह पंडित यांच्या बंधू ना विजयराजे पंडितांना गेवराईमधून विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. दोन दोन वेळी मतदार स्वीकारतील का? एवढा गाडा हाकता येईल का? हा प्रश्न उपस्थित झाला असेल. तीच परिस्थिती धनंजय मुंडे बाबत होती. त्यांना परळी विधानसभा ताकदीने लढायची आहे. आता त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली गेली तर सलग दोन निवडणुका लढवण्यासाठी ताकद मिळेल का? हेच पंडित आणि मुंडेंनी हेरले बीड लोकसभेचा विडा कोण उचलणार? असा सवाल उपस्थित केला गेला. तेव्हा कोणीच पुढे न आल्याने बजरंग सोनवणे यांना मोहिमेसाठी तयार केले गेले. सोनवणे हे केज मतदार संघातील जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांची दोन जिल्हापरिषद मतदार संघात ताकद आहे. खाजगी साखर कारखाना आहे, ते एक गुत्तेदार आहेत. बस्स या पलीकडे त्यांची ओळख नाही आणि एवढी ओळख लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पुरेशी आहे अशी राष्ट्रवादीची मानसिकता असली तर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये मात्र सन्नाटा पसरला आहे.