Lok sabha 2019 :भाजपचे गोव्यातील उमेदवार निवडण्यासाठी निवडणूक समिती स्थापन

4

सामना प्रतिनिधी । पणजी

गोव्यातील दोन लोकसभा आणि 3 विधासभा पोटनिवडणुकांसाठी उमेदवार निवड करण्यासाठी भाजपने राज्यस्तरीय निवडणूक समिती स्थापन केली आहे. ही समिती उमेदवार निश्चित करणार आहे. त्यानंतर दिल्लीत होणाऱ्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर उमेदवार जाहीर केले जातील अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी गुरुवारी भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

भाजपच्या निवडणूक समितीमध्ये अध्यक्ष म्हणून प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांची निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर,लक्ष्मीकांत पार्सेकर, आयुषमंत्री श्रीपाद नाईक, राजेंद्र आर्लेकर, दयानंद मांद्रेकर,खासदार नरेंद्र सावईकर,दत्तप्रसाद खोलकर,विजमंत्री नीलेश काब्राल, सदानंद तानावडे, संजीव देसाई, गोविंद पर्वतकर, दामोदर नाईक, कुंदा चोडणकर, सुलक्षणा सावंत आणि सतीश धोंड यांचा समावेश आहे. भाजपतर्फे उत्तर गोव्यातुन आयुष मंत्री श्रीपाद नाईक आणि दक्षिण गोव्यातुन नरेंद्र सावईकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.त्याशिवाय शिरोडा मतदारसंघातुन सुभाष शिरोडकर आणि मांद्रे मतदार संघातून दयानंद सोपटे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे समजते. म्हापशामध्ये उमेदवारी कोणाला द्यायची हे अजून ठरलेल नाही. त्यामुळे उमेदवार निश्चित झाल्यानंतर त्याची घोषणा दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर केली जाईल, असे तेंडुलकर म्हणाले.

लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची तयारी सुरु झाली असून श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी म्हालसा देवीचा आशीर्वाद घेऊन प्रचार सुरु केला असे तेंडुलकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री आजारी असले तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू असल्याचे सांगून लोकसभेच्या दोन्ही आणि विधानसभेच्या तिन्ही पोटनिवडणुका भाजपच जिंकेल असा दावा तेंडुलकर यांनी केला. खाणींचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजप योग्य ती पावले उचलत असून खाण अवलंबित नेहमीच भाजपसोबत असल्याचे विजमंत्री नीलेश काब्राल यांनी यावेळी सांगितले. राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग,नीतिन गडकरी,स्मृर्ती इराणी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येणार असल्याची माहिती तेंडुलकर यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोव्यात प्रचारासाठी येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. एप्रिलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मोदी गोव्यात प्रचारासाठी येतील आणि त्यांची मोठी सभा आयोजित केली जाईल असे तेंडुलकर म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या