lok sabha 2019 उत्तर पूर्व मुंबई- मतदारांचा कौल कुणाला? उत्सुकता कायम

सामना प्रतिनिधी, मुंबई

या मतदारसंघात 1980 नंतर भाजप आणि काँग्रेसने आलटून पालटून सत्ता भोगली. सलग दोनवेळा एकाच पक्षाच्या लोकप्रतिनीधीला निवडून द्यायचे नाही अशी या मतदारसंघाची परंपरा आजतागायत मतदारांनी कायम ठेवली आहे. या मतदारसंघात शिवसेना आमदार आणि नगरसेवकांची विकासकामे प्रचंड आहेत. पाण्याची समस्या, डोंगराळ भाग, जुन्या इमारतींचा प्रश्न या मतदारसंघात अनेक वर्षांपासूनचा आहे. हे प्रश्न मार्गी लावण्यात शिवसेनेचाच हातखंडा. येथील जनतेला विकासकामेच हवी आहेत, परंतु या मतदारसंघाची परंपरा पाहता यावेळी मतदारांचा कौल कुणाला याबाबतची उत्सुकता कायम आहे.

किती आमदार, खासदार आणि नगरसेवक
विक्रोळी मतदारसंघात शिवसेना आमदार सुनील राऊत तर भांडुपमध्ये शिवसेनेचे अशोक पाटील असे दोन आमदार आहेत. घाटकोपर पश्चिममध्ये भाजपचे राम कदम तर पूर्वेकडे प्रकाश मेहता आणि मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये समाजवादी पार्टीचे अबू आजमी आहेत तर मुलुंडमध्ये विद्यमान आमदार सरदार तारासिंह आहेत. विद्यमान खासदार किरीट सोमय्या आहेत. परंतु यावेळच्या निवडणुकीसाठी भाजपची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. घाटकोपर पश्चिममध्ये पाच नगरसेवक शिवसेनेचे आहेत. 1 राष्ट्रवादी आणि 1 नगरसेवक भाजपचा आहे. घाटकोपर पूर्वेला पाचपैकी 2 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. यात दोन भाजप तर एक राष्ट्रवादीचा आहे. शिवाजीनगर-मानखुर्दमध्ये 6 समाजवादी पार्टीचे तर 1 काँग्रेसचा आहे तसेच 2 शिवसेनेचे आहेत. भांडुपमध्ये शिवसेनेचे 3, भाजपचे 2 तर राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक आहे तर मुलुंडमध्ये भाजपचे 6 नगरसेवक आहेत.

शिवसेनेच्या विकासकामांचा धडाका
या मतदारसंघात शिवसेनेने प्रचंड विकासकामे मार्गी लावली आहेत. आमदार सुनील राऊत यांनी विक्रोळीस कन्नमवार नगर येथील संक्रमण शिबिरातील रहिवाशांचा पात्र-अपात्र हा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. हा प्रश्न हाती घेऊन पात्र आणि अपात्र अशा सर्वांनाच सरसकट घरे उपलब्ध करून दिली.

टागोरनगर आणि परिसरातील मुस्लिम बांधवांना कब्रस्तान नसल्यामुळे फार मोठया प्रमाणात गैरसोय होती. हे लक्षात घेऊन कब्रस्तानसाठी आरक्षित असलेली जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

कन्नमवार नगर आणि टागोरनगर या म्हाडा वसाहतीमधील रहिवाशांना म्हाडाने 300 टक्के वाढीस वेसा शुल्क अधिक व्याज आकारून वसुलीसाठी तगादा लावला होता. या विषयासंदर्भात गृहनिर्माणमंत्री आणि म्हाडा प्राधिकरणासोबत बैठक घेऊन वाढीव सेवा शुल्क अधिक व्याज माफ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत.

भांडुप गाव येथील ऐतिहासिक भांडुपेश्वर कुंडाचे सुशोभीकरण आणि गणपती विसर्जनासाठी कुंडाचे नियोजनबद्ध सौंदर्यीकरण करण्यासाठी पाच कोटी निधी मंजूर करून घेतला. अशी अनेक कामे मार्गी लावली.

भांडुपचे आमदार अशोक पाटील यांच्या विकासनिधीतून तसेच नगरसेवकांच्या विकासनिधीतून रुग्णालय, फायर स्टेशन, तरण तलाव, नानी पार्क, डायलिसीस सेंटर, रस्त्यावरील दिवे, खंडोबा टेकडीचे काम, समाजमंदिर हॉल, वाचनालय, लादीकरण, स्मशानाचे नूतनीकरण अशी अनेक विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत.

रेल्वेच्या समस्या
हार्बर लोकलने शिवाजीनगर आणि मानखुर्द हा भाग जोडला गेला असला तरीही गर्दीच्या वेळेत हार्बर लोकल भरून वाहत असते. येथे मेट्रोचा वडाळा-घाटकोपर- कासारवडवली हा 32 किलोमीटरचा मेट्रो -4 चा मार्ग जाणार असला तरीही त्यासाठी आणखी बराच अवकाश असून घाटकोपर ते वर्सोवा हा मुंबई मेट्रोचा मार्गही अपुरा पडत आहे.
मतदारांची टक्केवारी
मराठी – 40.48 टक्के
उत्तर भारतीय -12.25 टक्के
मुस्लिम-14 टक्के
गुजराती -10 टक्के

या मतदारसंघात झोपपट्टीसह आणि उच्च मध्यमवर्गीयांचीदेखील वस्ती आहे. या भागातील वाहतुकीच्या समस्या रेल्वे वाहतुकीशी संबंधित आहे. येथे मराठी भाषिकांची संख्या जास्त असून त्यापाठोपाठ गुजराती भाषिक आहेत तर मुस्लिम धर्मीयांची संख्याही बऱयापैकी असून उत्तर भारतीयांचे प्रमाणही मोठे आहे.