Lok sabha 2019 : दिल्लीपासून गल्लीपर्यंत घुमलेली नारेबाजी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. निवडणूक जवळ आली की विविध पक्षांकडून धोरण, जाहीरनामा किंवा सद्यस्थितीला अनुसरून नारे दिले जातात. निवडणूक झाली, सत्ता स्थापन झाली. तरी काही पक्षांनी दिलेले नारे अनेक काळापर्यंत स्मरणात राहतात. आतापर्यंत अनेक पक्षांनी दिलेल्या नाऱ्यांपैकी लोकप्रिय झालेले आणि अजूनही स्मरणात असलेल्या काही नाऱ्यांबाबतची ही माहिती.

निवडणूक आली की पोस्टर, मुलाखत, जाहिरात यातून अनेक नारे देण्यात येतात. देशातील पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून नारेबाजी सुरू झालेली दिसून येते. पक्ष, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला नेता, जाहीरनाम्यातील आश्वासने याला अनुसरून पक्षाकडून काही ठराविक नारे ठरवले जातात. काही नारे लोकप्रिय होऊन त्याचा निवडणुकीच्या मतदानावर प्रभावही दिसून येतो. आतापर्यंतच्या निवडणूक इतिहासात माजी पंतप्रधान लाल बाहदूर शास्त्री यांनी दिलेला ‘जय जवान, जय किसान’ हा नारा लोकप्रिय आहे. आजही अनेकांच्या तोंडी हा नारा येतो. 1965 च्या हिंदुस्थान- पाकिस्तान युद्धानंतर सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि देशातील खाद्यपदार्थांच्या टंचाईवर मात करण्यासाठी शास्त्री यांनी हा नारा दिला होता. त्यानंतर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या नाऱ्यामध्ये ‘जय विज्ञान’ हा शब्द जोडला.

shashtri14

‘समाजवादियोंने बांधी गांठ, पिछडे पांव सौ मे साठ’ सत्तरच्या दशकात समाजवाद्यांनी दिलेल्या या नाऱ्याने राजकारणात मोठे परिवर्तन घडवून आणले. या निवडणुकीनंतर जातीच्या आधारे मतविभागणी होऊन इतर मागासवर्गीयांचा मोठा वर्ग उदयास आला. हा नारा देशभरात गाजला आणि मंडल कमिशन आणि आरक्षणामध्ये मिळवण्यासाठी या नाऱ्याचा वापर झाला. 1971 मध्ये इंदिरा गांधी यांनी दिलेल्या ‘गरीबी हटाओ’ या नाऱ्यामुळे निवडणुकीत त्यांना ऐतिहासिक विजय मिळाला. त्यानंतर राजीव गांधी यांनीही या नाऱ्याचा योग्य वापर करत यश मिळवले. ‘इंदिरा हटाओ, देश बचाओ’ आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांनी दिलेल्या या नाऱ्याने जनता दलाच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्ष एकत्र आले आणि 1977 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा पराभव केला.

jayprakash14

‘राजा नहीं फकीर है, देश की तकदीर है’ 1989 मध्ये काँग्रेसचा विजयरथ रोखण्यासाठी विरोधी पक्षांचे नेतृत्व करणाऱ्या व्ही.पी. सिंग यांनी दिलेला हा नारा प्रचंड लोकप्रिय झाला. या नाऱ्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘फकीर नही, राजा है, सीआयए का बाजा है’ असा प्रतिनारा काँग्रेसने दिला होता. ‘मिले मुलायम-कांशीराम, हवा हो गए जय सिया राम’ 1993 मध्ये भाजपच्या राम रथयात्रेची घोडदौड रोखण्यासाठी सपा-बसपाने आघाडी केली. त्यानंतर हा नारा देण्यात आला. त्यामुळे भाजपच्या रथाचा वेग मंदावला. ‘तिलक, तराजू और तलवार, इनको मारो जूते चार’ हा नारा बसपाचे संस्थापक कांशीराम यांनी 80 च्या दशकात दिला. या नाऱ्यामुळे मायावती अडचणीत आल्या आणि बहुजन ऐवजी त्या सर्वजनबाबत बोलू लागल्या. ‘ब्राम्हण शंख बजायेगा, हाथी आगे जायेगा’ असा नारा त्यांनी नंतर दिला होता. ‘सबको देखा बारी-बारी, अबकी बारी अटल बिहारी’ 1996 च्या लखनौ सभेत हा नारा पहिल्यांदा देण्यात आला. त्यानंतर वाजपेयी यांना सत्ता मिळाली. मात्र, बहुमत सिद्ध करता न आल्याने फक्त 13 दिवसच ते पंतप्रधान होते.

lal-atal14

‘कांग्रेस का हाथ, आम आदमी के साथ’ या नाऱ्याच्या मदतीने 2004 मध्ये भाजपचा पराभव करून काँग्रेसप्रणीत युपीए आघाडी सत्तेत आली. सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवत काँग्रेसने हा नारा दिला होती. ‘मां, माटी, मानुष’ 2010 मध्ये झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने हा नारा दिला होता. ममता बॅनर्जी यांच्या कवितेच्या पुस्तकाचे हे वाक्य होते. त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या पत्रिकेलाही हेच नाव देण्यात आले. ‘अबकी बार, मोदी सरकार’ 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करत भाजपने हा नारा दिला होता. त्यानंतर आलेल्या मोदी लाटेने भाजपला विजय मिळाला.’ अच्छे दिन आनेवाले है’ हा नाराही या निवडणुकीत लोकप्रिय झाला होता. ‘कट्टर सोच नहीं, युवा जोश’ 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने हा नारा दिला होता. मात्र, त्याचा फारसा प्रभाव दिसला नाही. राहुल गांधी आणि पक्षातील तरुणांना पुढे आणण्यासाठी काँग्रेसने हा नारा दिला होता. ‘मोदी है तो मुमकिन है’ लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर हा नारा आता चर्चेत आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपने हा नारा दिला आहे. तसेच पाच वर्षांच्या कार्यकाळातील विकास कामांची माहिती त्यांच्याकडून देण्यात येत आहे. तर पाच वर्षात झालेल्या घोटाळ्यांमध्ये नरेंद्र मोदी यांचा हात असल्याचा आरोप करत काँग्रेसने ‘चौकीदार चोर है’ हा नारा दिला आहे.त्याचा अनेक ठिकाणी प्रभावही दिसत आहे.