Lok sabha 2019 : अवैध मद्यविक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर करडी नजर

सामना प्रतिनिधी । नगर

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या निवडणूक काळात कोणत्याही प्रकारची अवैध मद्यविक्री होणार नाही तसेच वाहतूक होणार नाही, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिल्या आहेत. असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील नगर आणि शिर्डी (अ.जा.) लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिल्या आहेत. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे कार्यवाही हाती घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यानंतर पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आगामी काळात याबाबत दक्षतेच्या सूचना केल्या. विभागाचे अधीक्षक पराग नवलकर, उपाधिक्षक सी.पी.निकम यांच्यासह जिल्ह्यातील सर्व निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अवैध मद्यनिर्मिती करणारे सराईत गुन्हेगार, हातभट्टी निर्मितीचे केंद्र यावर करडी नजर ठेवून अशा प्रकारांना आळा घालण्यात येणार आहे. अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्यांवर महसूल विभागासह एकत्रितपणे कार्यवाहीचे आदेश जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिले आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत ज्याप्रमाणे अवैध मद्यविक्री आणि वाहतुकीला जरब बसली, तशीच कार्यवाही अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विभागातील निरीक्षकांना ज्या अनुज्ञप्तींची मद्यविक्री मागील वर्षाच्या तुलनेत 30 टक्के अधिक आहे, अशा अनुज्ञप्तींवर पथकाची विशेष नजर राहणार आहे. नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी दोन विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 12 विधानसभा क्षेत्रनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून अशा प्रकारच्या अवैध मद्यविक्री आणि वाहतूकीवर प्रतिबंधासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज झाला आहे.