Lok sabha 2019 मुंबई शहर जिल्ह्यात 24 लाख 57 हजार मतदार

सामना ऑनलाईन । मुंबई

केंद्रीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी 10 मार्च रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 ची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मुंबई शहर जिल्ह्यात 30 मुंबई दक्षिण- मध्य व 31 मुंबई दक्षिण हे दोन लोकसभा मतदार संघ असून 24 लाख 57 हजार 26 पात्र मतदार आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात सोमवार, 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात मतदान होईल व सोमवार, 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले आहे.

Lok sabha 2019 दक्षिण-मध्य मुंबई : विकासकामांच्या जोरावर शिवसेनाच बाजी मारेल

2601 मतदान केंद्र व 35 हजार कर्मचारी
31 जानेवारी, 2019 रोजी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीनुसार एकूण 24 लाख 56 हजार 497 मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष मतदार 13 लाख 44 हजार 955 व स्त्री मतदार 11 लाख 11 हजार 437 इतर 105 अशी मतदारांची संख्या आहे. यात 18 ते 19 वयोगटातील मतदार 17 हजार 404 असुन 80 वयापेक्षा अधिक असे 1 लाख 35 असे मतदार आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात एकूण 2601 मतदान केंद्र आहेत. लोकसभेची निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यासाठी साधारणत: 35 हजार कर्मचारी कार्यरत असतील.

voting-1

टोल फ्री क्रमांक
आचारसंहिता तसेच निवडणूक खर्चाचे पर्यवेक्षण करण्यासाठी 40 फिरती पथके – (Flying Squad) 30 स्थिर देखरेख पथके (Static Surveillance Team) 20 पथके (Video Surveillance Team) व 11 दृकश्राव्य चित्रिकरण पथके (Video Viewing Team) विधानसभा मतदार संघनिहाय स्थापित करण्यात आलेले आहेत.नवीन मतदार नोंदणीबाबत माहिती आवश्यक असल्यास तसेच आचारसंहितेचा भंग किंवा निवडणुकीच्या खर्चासबंधी तक्रारीबाबत मुंबई शहर जिल्ह्यासाठी तक्रार कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आला आहे.

मिडिया सर्टीफिकेशन व मॉनिटरिंग कमिटी (MCMC)
केबल, दूरचित्रवाणी, सोशल मिडिया तसेच इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे प्रसारित करावयाच्या निवडणूक जाहिरातीची पडताळणी व परवानगीसाठी मिडिया सर्टीफिकेशन व मॉनिटरिंग कमिटी (MCMC) स्थापन करण्यात आली आहे.