काँग्रेसपुढे अडचणींचा डोंगर; शेट्टींचा ठेंगा, विखेंनी दाखविला इंगा, आता मुस्लिम घेताहेत पंगा

विजय जोशी । नांदेड

मागच्या लोकसभा निवडणुकीत मोदींची लाट असूनही महाराष्ट्रातून आपले राजकीय वजन वापरुन नांदेड आणि हिंगोलीची जागा राखण्यात यशस्वी झालेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्यापुढील राजकीय अडचणी वाढत चालल्या आहेत. समविचारी पक्षांशी जुळवून घेण्याचे जेवढे प्रयत्न ते करीत आहेत तेवढी निराशा त्यांच्या पदरात पडत आहे.

काय आहे विखे आणि पवार यांच्यातील सत्तासंघर्ष? वाचा सविस्तर…

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अशोकरावांनी काँग्रेसच्या संघटना बांधणीसाठी मनापासून प्रयत्न केले खरे, परंतु पक्षांतर्गत विरोधकांनी या प्रयत्नांना नेहमीच खो घातला. आता लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर अशोकरावांनी दुप्पट उत्साहाने काँग्रेसची संघटना बांधण्याचे आणि जनमानसात काँग्रेसचे विचार रुजविण्याचे काम मनापासून हाती घेतले खरे, पण इथेही त्यांच्या हातात फारसे काही पडले नाही.

Lok Sabha 2019 राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आघाडीसाठी तयार झाले त्याचे श्रेय अशोकरावांना दिले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त करुन आघाडी होवू नये अशी भूमिका घेत होते. परंतु अशोकरावांनी प्रत्यक्ष शरद पवारांशी चर्चा करुन आघाडी घडवून आणली. दोन्ही पक्षांची आघाडी झाल्यामुळे आता काँग्रेसची स्थिती महाराष्ट्रात बळकट होईल, असे वाटत होते. परंतु बाळासाहेब आंबेडकर यांनी एमआयएमच्या सहकार्याने स्थापन केलेली वंचित बहुजन आघाडी अशोकरावांची डोकेदुखी ठरली. वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाआघाडीत व्हावा यासाठी अशोकरावांनी बाळासाहेबांचे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु बाळासाहेबांनी काँग्रेस समोर जाचक अटी टाकल्या. असे सांगतात की, वंचित बहुजन आघाडी महाआघाडीमध्ये सामील होण्याची शक्यता निर्माण झाली होती, कारण एमआयएमचे सर्वेसर्वा असुदोद्दीन ओवेसी यांनी नांदेडच्या सभेमध्ये असे सांगितले की, वंचित बहुजन आघाडीला महाआघाडीत घेण्यास एमआयएमचा अडसर आहे असे काँग्रेसला वाटत असेल तर आम्ही दूर जातो, तुम्ही बाळासाहेबांशी चर्चा करुन वाटाघाटी करा आणि आघाडी करा. ओवेसींच्या या विधानानंतर वंचित बहुजन आघाडी महाआघाडीत सामील होणार आणि काँग्रेसची वोट बँक परत येणार अशी स्पप्ने काँग्रेसच्या कार्यकत्र्यांना पडू लागली. पण काही दिवसातच बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केले की, आम्ही एमआयएमशी आघाडी केली आहे, त्यांना आम्ही दूर लोटणार नाही, आणि यावरुनच सारे काही बिनसले आणि त्याचा परिणाम बाळासाहेबांनी काँग्रेसशी आणि महाआघाडीशी संबंध तोडण्याची घोषणा करण्यात झाला.

Ashok Shankarrao Chavan

वंचित बहुजन आघाडीकडून अशी वंचना पदरी पडल्यानंतर अशोकरावांना जबरदस्त धक्का दिला तो काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी. राधाकृष्ण विखे यांचा मुलगा डॉ.सुजय विखे तडक भाजपात दाखल झाले. त्याआधी अशोकरावांनी विखेंशी चर्चा करुन सुजयच्या पक्षांतरास प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला. सुजयला राष्ट्रवादी काँग्रेसने नगरची उमेदवारी द्यावी असा एक उपायही सुचवून पाहिला. परंतु सुजयने ऐकले नाही. अखेर त्याने भाजपाची वाट धरली आणि तो भाजपाच्या तंबूत दाखल झाला. सुजयच्या पक्षांतरामागे राधाकृष्ण विखे पाटील यांचा हात नाही अशी सारवासारव काँग्रेसचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली असली तरी ते पटणारे नाही.

Lok sabha 2019 नगरमध्ये 1999 ची पुनरावृत्ती करणार, सुजय विखेंचा पवारांना इशारा

काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीची गुरुवारी जी बैठक झाली त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर मतदारसंघात आपण राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही असे स्पष्ट केले आहे. राधाकृष्ण विखे पाटलानंतर राजू शेट्टी यांनी अशोकरावांना ठेंगा दाखविल्याचे कळते. जागा वाटपावरुन नाराज झालेल्या शेट्टीने येत्या लोकसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’चे धोरण अवलंबिल्याचे समजते.

राधाकृष्ण विखे पाटील आणि राजू शेट्टी यांनी केलेली घोर निराशा कमी होती म्हणून की काय नांदेडमध्ये अशोकरावांनी बोलाविलेल्या उलेमांच्या (मुस्लिम धर्मगुरु) सभेत या धर्मगुरुंनी अशोकरावांना मुस्लिमांच्या आर्थिक आणि राजकीय स्थितीवरुन चांगलेच धारेवर धरल्याचे कळते. नांदेड जिल्ह्यात तरी मुस्लिम मतदार प्रामुख्याने काँग्रेसच्या पाठिशी आहे हे एक वर्षापूर्वी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सिध्द झाले आहे. परंतु उलेमांच्या बैठकीत मात्र उलेमांनी अशोकरावांना जाब विचारला. नांदेड जिल्ह्याने पूर्वी मुस्लिम आमदार करण्याची किमया दाखवली आहे. मुस्लिम नेतृत्वावर इथल्या जनतेने नेहमीच विश्वास दाखविला आहे असे असतानाही आपण गेल्या वीस वर्षात एकाही मुस्लिम कार्यकत्र्यास तिकीट दिले नाही याचे काय कारण असा प्रश्न विचारुन मुस्लिमांनी अशोकरावांकडे आपली नाराजी व्यक्त केली. अशोकरावांनी नेहमीप्रमाणे मुस्लिम मतदारांना भारतीय जनता पक्षाविरुध्द भडकावले. भाजप सत्तेवर आला तर तुमच्या खाण्या पिण्यावर तर बंधने येतीलच शिवाय तुम्हाला बाहेर फिरणेही मुश्कील होईल, असेही ते म्हणाल्याचे कळते. यावर मुस्लिम नागरिकांनी अशोकरावांना सांगितले की, काँग्रेसच्या 70 वर्षांच्या कारकीर्दीत जेवढे अत्याचार मुसलमानांवर झालेत त्यापेक्षा कित्येक पटीने कमी भाजपाच्या कारकीर्दीत झाले आहेत. उलेमांच्या बैठकीनंतर काँग्रेसच्या हातातून मुस्लिमांची मते निसटण्याची शंका व्यक्त होत आहे. एकंदरीत अशोकरावांच्या मागे एका मागून एक शुक्लकाष्ठ लागले असल्याचे दिसते. काही प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार काँग्रेसचे अध्यक्ष राहुलगांधी, अशोकराव चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर कारवाई करणार असल्याचेही समजते.