Lok sabha 2019 : महिला मतदार जास्त असूनही महिला खासदारांची संख्या कमी

35

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवसच उरले आहेत. देशात लोकसभेच्या एकूण 543 मतदारसंघांपैकी 73 जागा अशा आहेत की जिथे पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की येथून सर्व महिला खासदारच निवडून येतात. या महिलांबहूल लोकसभा मतदारसंघांतून आतापर्यंत केवळ 3 ते 4 महिला खासदारच लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यात 2009 ला चार तर 2014 ला निवडून आलेल्या तीन महिला प्रतिनिधींचा समावेश आहे.

सध्याच्या लोकसभेतील 543 खासदारांपैकी केवळ 66 खासदार महिला आहेत. यातील तब्बल 63 महिला खासदार पुरुष मतदार जास्त असलेल्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. 1951 मध्ये 22 महिला खासदार बनल्या होत्या,तर 1977 मध्ये महिला खासदारांची संख्या घटून 19 वर गेली.2009 आणि 2014 मध्ये मात्र लोकसभेत 66 या विक्रमी संख्येने महिलांनी प्रवेश मिळवला.सध्या लोकसभेत सर्वात जास्त 31 महिला खासदार जनता भारतीय पक्षाच्या आहेत. तर तृणमूल काँग्रेसच्या 12 तर काँग्रेसच्या 4 महिलांनी खासदारकी मिळवली आहे. लोकसभा सभागृहात सर्वाधिक 14 महिला खासदार उत्तर प्रदेशच्या आहेत.राज्यसभेत 244 पैकी 28 महिला खासदार आहेत, त्यात 7 भाजपच्या तर 7 काँग्रेसच्या आहेत.

लोकसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत 73 महिलांबहूल मतदारसंघांत महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती. या जागांवर महिलांचे सरासरी मतदानही पुरुषांपेक्षा अधिक होते.2014 च्या लोकसभा निवडणुकीत 73 मतदारसंघांत 3 कोटी 50 लाख महिला मतदारांनी आपला मताधिकार बजावला.तर पुरुष मतदारांची संख्या 3 कोटी 36 लाख होती.

आपली प्रतिक्रिया द्या