रायगडातून सुनील तटकरे ‘गायब’; निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

4
sunil-tatkare

सामना प्रतिनिधी । पनवेल

रायगड लोकसभा मतदारसंघातून यावेळी नावात साधर्म्य असलेले एक नव्हे, तर तीन सुनील तटकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र यातील दोन अपक्ष सुनील तटकरे गेल्या आठवडय़ापासून ‘गायब’ असून त्यांनी आपला दैनंदिन खर्चाचा हिशेब दिलेला नाही. त्यातच ताळमेळ बैठकांनाही उपस्थित न राहिल्याने निवडणूक आयोगाने दोन्ही तटकरेंना नोटीस बजावली आहे.

राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे तर त्यांच्याप्रमाणेच नावात साधर्म्य असलेले सुनील सखाराम तटकरे व सुनील पांडुरंग तटकरे या दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीने रायगडच्या रणसंग्रामात रंगत आली असून राष्ट्रवादीला मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान नियमाप्रमाणे प्रत्येक उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केल्यापासून त्यांच्या खर्चाचा दैनंदिन हिशेब देणे बंधनकारक असताना त्या दोन्ही अपक्ष उमेदवारांनी अद्यापि कसल्याही प्रकारचा हिशेब प्रशासनाकडे सादर केलेला नाही. याबरोबरच खर्चाचा ताळमेळ, बैठकांना उपस्थिती लावलेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने या उमेदवारांना नोटिसा बजावल्या आहेत.

मोबाईल नॉट रिचेबल; पडद्यामागून सूत्रे हलली

उमेदवारी अर्ज दाखल करताना नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावरही निवडणूक यंत्रणेने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र या दोन्ही अपक्ष तटकरे उमेदवारांचा मोबाईल नॉट रिचेबल लागत आहे. त्यांच्या घरच्या पत्त्यांवरही संपर्क झाला नाही. दरम्यान मागच्या निवडणुकीत एका अपक्ष तटकरे उमेदवाराने तब्बल 10 हजारांच्या आसपास मते खाल्ल्याने राष्ट्रवादीला पराभवाची धूळ चाखावी लागली होती. आता नावात साधर्म्य असलेले एक सोडून दोन उमेदवार असल्यामुळे कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून पडद्यामागून सूत्रे हलवण्यात आली का, असा सवाल विचारला जात आहे.