राष्ट्रवादीचा गड उद्ध्वस्त, माढामध्ये महायुतीचे नाईक-निंबाळकर विजयी


सामना प्रतिनिधी । माढा

राज्यात लक्षवेधी ठरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी विजयी मिळवला. माढा मतदार संघात रणजित सिंह नाईक निंबाळकर व राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात काट्याची टक्कर सुरू होती. परंतु दुपार नंतर निंबाळकर यांनी आघाडी घेत मोठा विजय संपादन केला. यानंतर शहर व तालुक्यात एकच जल्लोष साजरा करण्यात आला. सकाळी संपूर्ण देशात भाजपाच्या बाजूने कौल लागल्याचे दिसताच मंदिर परिसरातील व्यापारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. तर शहर भाजपाच्या कार्यालयात देखील कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला.

दरम्यान, माढाचे महायुतीचे उमेदवार रणजित निबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, माजी जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोगे पाटील, पंढरपूर शहर प्रमुख रवी मुळे उपस्थित होते.

माढा लोकसभा मतदारसंघामध्ये कर्माळा, माढा, सांगोला, माळशिरस, फलटन आणि माण ही सहा विधानसभा क्षेत्रे येतात. गेल्या दोन निवडणुकीमध्ये या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. 2014 मध्ये झालेल्या 16 व्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहीते पाटील विजयसिंह यांनी विजय मिळवला होता. त्यांना 4,89,989 मतं मिळाली होती, तर त्यांचे विरोधक स्वाभिमान पक्षाचे सदाभाऊ खोत यांना 4,64,645 मतं मिळाली होती.

2009 मध्ये झालेल्या 15 व्या लोकसभा निवडणुकीत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांनी विजय मिळवला होता. शरद पवार यांना 5,30,596 मतं मिळाली होती, तर भाजपच्या सुभाष देशमुख यांना 2,16,137 मतं मिळाली होती.