माढ्यातून लंगोट बांधून का पळाले? मोहिते-पाटील कुटुंबीयांचा पवारांवर हल्लाबोल

2

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

lok sabha election 2019 पायाखालची वाळू सरकू लागल्याने देशाचे नेते गल्लीतल्या राजकारणावर उतरलेत. दादांच्या मांडय़ा काढणारे माढय़ातून लंगोट बांधून का पळाले, असा हल्लाबोल विजयसिंह यांचे धाकटे बंधू जयसिंह मोहिते-पाटील यांनी अकलूज येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार यांच्यावर केला.

नातेपुते येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार यांनी संघाची हाफ चड्डी घालून मांडय़ा दाखवू नका, सहकारमहर्षींना काय वाटेल, अशा शब्दांत मोहिते-पाटील यांच्यावर अतिशय जोरदार टीका केली. यावर जयसिंह मोहिते-पाटील यांनी पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. पायाखालची वाळू सरकली की माणसाचा तोल जातो, वय समजत नाही. कोणत्या पदावर आहे हे समजत नाही. महाराष्ट्रात राष्ट्रवादीची फक्त एक जागा जिंकून येईल असे ते म्हणाले.

विजयदादांना यंदा माढय़ाचे तिकीट पक्के असताना उंदरासारखे खेळवायला या नेत्याने सुरुवात केल्यावर आता या मांजरालाच पकडू अशी भूमिका घेतल्याने लंगोट लावलेले पळून गेले. यावेळी तुमच्या मांडय़ाही सगळय़ांना पाहायला मिळाल्या असत्या, मात्र तुम्ही पळून गेलात अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, मोहिते-पाटील कुटुंबीयांनी या निवडणुकीत भाजप उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने माढय़ातून विजयी करण्याचा निर्धार केला आहे.