परभणी : शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्यच! संजय जाधव यांनी विटेकरांना केले चारीमुंड्या चित

45

सामना प्रतिनिधी । परभणी

सतराव्या लोकसभा निवडणूकीच्या आज झालेल्या मतमोजणीत शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांना सुमारे 42 हजार 399 मतांनी पराभूत करत शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राखला. एकूण झालेल्या 12 लाख 53 हजार 612 मतदानापैकी संजय जाधव यांना 538941 तर पराभूत उमेदवार राजेश विटेकर यांना 496542 मते पडली. वंचित आघाडीचे उमेदवार अलमगिर खान यांना 14946 मते मिळाली. दुरंगी झालेल्या या चुरशीच्या लढतीत नवख्या राजेश विटेकरांना दारूण पराभव स्वीकारावा लागला.

संजय जाधव यांच्या विजयानंतर परभणी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. फटाके फोडण्यात आले. शिवसेना, भाजपा, शिवप्रेमी जनता व शिवसैनिकांनी या विजयाचा अक्षरश: जल्लोष साजरा केला. अभूतपूर्व अशा मिरवणूकीत डिजेच्या तालावर ‘शिवसेना…..शिवसेना’ या गाण्यावर शिवसैनिकांनी धमाल नृत्य केले. तसेच ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा गगनभेदी घोषणा शिवसैनिक देत होते.

कट्टर शिवसैकांमुळेच परभणी लोकसभा मतदार संघाचा शिवसेनेचा बालेकिल्ला 30 वर्षानंतरही अभेद्या राहिला आहे. शिवसेनेचे उमेदवार खासदार संजय जाधव यांनी दुसऱ्यांना विजय प्राप्त करून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. 1991पासून परभणी लोकसभा मतदार संघात शिवसेनेने सुरु केलेली विजयी घोडदौड 2019 च्या निवडणुकीतही कायम ठेवली आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी एकाकी प्रचार यंत्रणा राबविली. प्रचाराचे नियोजन मतदारांशी थेट संपर्क, कार्यकत्र्यांची तगडी फळी आणि दांडगा जनसंपर्क या सर्व बाबीमुळे खासदार संजय जाधव यांनी निवडणूकीत विजय मिळविला आहे. परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 माजी आमदार, एक माजी खासदार या शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील तगडे मनुष्यबळ असतानाही खासदार जाधव यांनी कार्यकत्र्यांंमध्ये मिसळून एकाकी दिलेली लढत त्यांच्या विजयाचे खास वैशिष्ट्ये ठरते. विरोधी पक्षाकडे नेत्यांची प्रचंड फौज असताना कार्यकर्ता विरुद्ध नेता अशीही निवडणूक झाली असल्याचे जाधव यांचे म्हणणे होते. प्रत्यक्षात मतदानांतरही असेच चित्र दिसून आले आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांनी अपेक्षेपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजयश्री खेचून आणली आहे. खासदार संजय जाधव यांनी शिवसेनेचा गड राखला आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर परभणी हा बालेकिल्ला अभेद्य राहिल, असा ठाम विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत होते. या विश्वासाला तडा जावू नये, यासाठी शिवसैकांनी मतमोजणीच्या दिवशी सकाळपासूनच मतमोजणी केंद्रावर मोठी गर्दी केली होती. पहिल्या फेरीपासून जसजसा निकाल बाहेर येत होता, तसतसा शिवसैनिकांतील उत्साह व्यक्त होत होता.

परभणीतील शिवसेनेच बालेकिल्ला अभेद्य रहावा, यासाठी शिवसैनिकांची नजर केवळ आकड्यांवर फिरत होती. शिवसेना उमेदवार किती मताधिक्याने पुढे आहे, असा सवाल केला जात होता. शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादीने आत्तापर्यंत जेजे उमेदवार दिले आहेत, त्यांच्यावर पराभवाच्या नामुष्कीची परंपरा यावेळीही कायम राहिली असल्याचे पहावयास मिळाले. अपेक्षेप्रमाणे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात सरळ लढत झाली. वंचित बहुजन आघाडी यांच्यामुळे विजयश्री खेचून आणण्यासाठी एक प्रकारे मदतच झाली. आकडेवारीच्या भोवऱ्यात विजयाची घोषणा आडकली होती. तरीही शिवसैनिकांनी संजय जाधव हेच विजयी झाले असल्याचे समजताच विद्यापीठ परिसरामध्ये एकच जल्लोष केला. वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर शिवसैनिकांनी गुलालाची उधळन करत आणि ‘जय भवानी जय शिवाजी तसेच खासदार संजय जाधव तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. उत्साही शिवसैनिकांनी भगवाध्वज दुचाकी वाहनांवर घेऊन शहराच्या मुख्य भागात शिवसेना निवडून आल्याबद्दलचा आनंद व्यक्त केला. वसमत रोडवर ठिक-ठिकाणी विजयी मिरवणूकीचे स्वागत करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी यांनी पहिल्या दिवसापासूनच या निवडणूकीत वैयक्तिक प्रतिष्ठा केल्याप्रमाणे जाहीराती केल्या. ‘खासदार बदला… जिल्हा बदलेल’ अशा पान-पान भरुन जाहिराती केल्या. परंतु त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. बाबाजानी दुर्राणी यांनाच आपल्या पाथरी विधानसभा मतदार संघातून 4 वर्षापूर्वी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे त्यांच्या जाहिरातीला जनमाणसाकडून फारसे गांभिर्याने घेतले गेले नाही. आता ते जनतेचा कौल म्हणून हा पराभव स्विकारत आहेत.

महिला आघाडीने गंगाखेडची कलम वाटली
शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सखुबाई लटपटे यांनी खासदार संजय जाधव यांचा विजय जाहीर होताच गंगाखेड येथील ग्यानुमामाची कलम म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिठाईचे वाटप केले. गंगाखेड शहरात तसेच परभणी येथेही मिठाई वाटण्यात आली. त्यांच्या समवेत महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या