वार्तापत्र- विकासकामांनाच मतदारांचा पाठिंबा; महायुतीची प्रचारात आघाडी

4
gopal-shetty

सामना प्रतिनिधी । मुंबई

lok sabha election 2019 उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून तब्बल 19 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. परंतु खरी लढत होणार आहे ती महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यात. नगरसेवक ते खासदार असा यशस्वी पल्ला गाठणारे, विभागातील अनेक समस्यांची जाण असणारे आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध असणारे खासदार म्हणून गोपाळ शेट्टी यांची ओळख आहे. विविध समाजबांधवांकडूनदेखील त्यांना पाठिंबा मिळत असून शेट्टी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत येथून दारुण पराभव झालेले काँग्रेसचे संजय निरुपम आता उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. काँग्रेसने उत्तर मुंबईतून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला संधी दिली आहे. उर्मिला बॉलीवूड सेलिब्रेटी असल्याने तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमत आहे. पण या गर्दीचे मतामध्ये रूपांतर होणार का, हा प्रश्नच आहे. याचे कारण म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा विजयी रथ रोखण्यासाठी या मतदारसंघातून 2004 मध्ये अभिनेते गोविंदा यांना संधी दिली होती. काँग्रेसचा हा प्रयत्न त्यावेळी यशस्वीदेखील झाला, पण निवडून आल्यानंतर गोविंदा साधे या मतदारसंघात फिरकलेदेखील नव्हते. ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उर्मिलालादेखील या विभागातील समस्यांची जाण नाही. दुसरीकडे गोपाळ शेट्टी यांनी अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्यामुळे सेलिब्रेटींपेक्षा विकासकामांनाच पाठिंबा देऊ, असा जनमताचा कौल आहे.

विविध समाजांचा वाढता पाठिंबा

चारकोपमधील कुणबी आणि लेवा पाटीदार समाजाने शेट्टी यांना पाठिंबा दर्शवला आहे. चारकोपमध्ये कुणबी समाज मोठय़ा प्रमाणात वास्तव्यास असून या संस्थेशी सुमारे सहा हजार कुणबी जोडले गेलेले आहेत, अशी माहिती संस्थेचे वजिरकर यांनी दिली. याशिवाय मुस्लिम, भटक्या आणि विमुक्त समाजातील लोकांनीदेखील शेट्टी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

मालवणीमधील रखडलेले प्रश्न सोडवले

north-mumbai-map

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील मालाड विधानसभा क्षेत्रात अस्लम शेख हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. मालाड–मालवणीमधील नागरिकांच्या वर्षानुवर्षे रखडलेल्या समस्या सोडवण्यात ते अपयशी ठरल्याने खासदार गोपाळ शेट्टी यांनी पुढाकार घेत येथील अनेक प्रश्न सोडवले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला येथून मोठा फायदा होऊ शकतो.

अंबुजवाडी, राठोडी, खारोडी, धारवली येथे मोठय़ा प्रमाणात लोक उघडय़ावर शौचाला बसायचे. खासदार गोपाळ शेट्टी यांनी ‘स्वच्छ भारत’अंतर्गत खासदार निधीतून तसेच लोकांच्या सहकार्याने येथे 750 हून अधिक शौचालये बांधली. येथील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी खासदार शेट्टी यांनी एस. व्ही. रोड मालाड आणि मार्वे रोड रुंदीकरणाचे काम हाती घेतले. एव्हरशाइन नगर ते इन्फिनिटी मॉल मालवणी गेट ते लगून रोड, राठोडी गाव ते जनकल्याण नगर या डीपीमध्ये प्रस्तावित असलेल्या रोडच्या निर्माणासाठी प्रयत्न केले. मालवणीमधील 20 एकरच्या केंद्र सरकारच्या जागेवरील 13 एकर जागेमध्ये मैदान तर उर्वरित जागेवर केंद्रीय विद्यालय आणि केंद्रीय सचिवालय निर्माण होणार आहे यासाठी शेट्टी यांनीच प्रयत्न केले होते.