माझा हट्ट पुरवण्यासाठी नगर जिल्हा खंबीर, सुजय विखेंचा पवारांना टोला

252

सामना प्रतिनिधी । नगर

माझा हट्ट पुरवण्यासाठी नगर जिल्हा खंबीर आहे. मला दुसऱ्या आजोबांची गरज नाही, असे म्हणत एनडीएचे उमेदवार सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला. राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारा मी तिसरा उमेदवार आहे. भाजप आणि विखे यांची ताकद काय असते हे जिल्ह्याने दाखवून दिले आहे, अशा शब्दात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या विजयाचे समर्थन केले आहे.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, संघर्षाच्या राजकारणात हा सर्वात मोठा विजय आहे. आम्हा कुटुंबाला अनेक संकटातून जावे लागले. हा विजय स्वर्गवासी बाळासाहेब विखे यांना श्रद्धांजली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांनी उमेदवारी डावलली, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्यामुळेच मी भाजपमध्ये आलो. नातवाचा हट्ट पुरवण्यासाठी मला दुसऱ्या आजोबाची अजिबात गरज नाही. जिल्ह्यातील जनतेनेच माझे हट्ट पुरवले आहेत. गोरगरीब जनता, सर्वसामान्य कर्मचारी यांना या विजयाचे श्रेय जाते. तसेच आमदार, पालकमंत्री, नगरसेवक यांनीही मला स्वीकारले. पक्षात नवीन असूनही भावाप्रमाणे प्रेम केले. सर्वजण एकत्रित राहिले. त्यामुळे हा विजय शक्य झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास टाकला. तो विश्वास सार्थ ठरला. उद्धव ठाकरे यांनी उत्तरेची जबाबदारी दिली होती. ती यशस्वीरित्या पार पाडली. नरेंद्र मोदी मोठे नेते आहेत. एक हाती सत्ता आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी अच्छे दिन आले आहेत. त्यामुळेच आता वडिलांनाही भाजपमध्ये येण्यासाठी आग्रह करेल. इकडे एवढे चांगले आहे, तिकडे राहण्यात अर्थच नाही. विशेष म्हणजे नगर शहरातून सर्वाधिक मताधिक्य मिळालेले आहे. नगर शहरामध्ये नवीन उद्योग आणण्याचा शब्द मी दिलेला आहे. तो मी पूर्ण करेल. परंतु जनतेला आता दडपशाही खाली जगावं लागणार नाही. माझा संघर्ष काँग्रेसबरोबर कधीच नव्हता. काँग्रेसने आमच्या कुटुंबाला खूप काही दिले. आमचा संघर्ष नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहिलेला आहे आणि तो यापुढेही राहील, असे डॉक्टर सुजय विखे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या