आजोबांच्या पराभवाचा बदला नातवाने घेतला, वाचा विखे-पवार घराण्याचा सत्तासंघर्ष

144

सामना प्रतिनिधी । नगर

लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मानाच्या केलेल्या नगर दक्षिण मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांनी विजय मिळवला. सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांचा पराभव केला आणि 30 वर्षापूर्वी झालेला आजोबांचा पराभवाचा बदला घेतला. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजोबांबाबत बोलल्याने नाराज झालेल्या सुजय विखे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता.

माझा हट्ट पुरवण्यासाठी नगर जिल्हा खंबीर, सुजय विखेंचा पवारांना टोला

विखे-पवार यांचा काय आहे सत्तासंघर्ष

विखे आणि पवार घराण्यातील सत्तासंघर्ष जवळपास 30 वर्ष जुना आहे. शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण यांच्यात दोन गट पडल्यानंतर विखेंनी नेहमीच चव्हाण यांच्या पारड्यात मत टाकले आहे. बाळासाहेब विखे पाटील यांचा नेहमीच चव्हाण यांना पाठिंबा राहिला आहे. त्यामुळे पवार आणि विखे वादाला सुरुवात झाली. 1991 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा वाद विकोपाला केला होता. नगर मतदार संघातून यशवंतराव गडाख हे काँग्रेसचे उमेदवार होते. तर बाळासाहेब विखे पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते गडाखांविरुद्ध अपक्ष लढले. पण यशवंतराव गडाख हे अटीतटीच्या लढतीतून निवडून आले. त्यानंतर बाळासाहेब विखे-पाटील यांनी निवडणुकीच्या काळात शरद पवार आणि यशवंतराव गडाखांनी त्यांचं चारित्र्यहनन केलं, असा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला.

या खटल्यामध्ये गडाखांचा विजय रद्द झाला, पण त्यांच्यासह शरद पवारही अडचणीत आले. गडाख व पवारांची नावे मतदारयाद्यांतून वगळण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यामुळे दोघांनाही सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी आली. दोघांचेही राजकीय अस्तित्व पणाला लागले. पवारांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. काही साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीतील काही मुद्द्यांवर बराच उहापोह झाला व अखेर सर्वोच्च न्यायालयाने पवारांना दिलासा देऊन, त्यांचे नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याची मुभा दिली. गडाखांवरील बंदी मात्र कायम राहिली.

दुसऱ्या पिढीचा संघर्ष

पहिल्या पिढीतील हा संघर्ष दुसऱ्या पिढीतही दिसून आला. पवारांचे पुतणे अजित पवार आणि बाळासाहेब विखेंचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातही सत्तासंघर्ष दिसून आला. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या आग्रहाने रामदास आठवले यांना शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं निश्चित झालं. त्याबदल्यात राष्ट्रवादीकडून नगर दक्षिणची जागा बाळासाहेब विखे पाटील यांच्यासाठी सोडण्याचा निर्णय करण्यात आला होता. पण ऐनवेळी पवारांनी भूमिका बदलली. नगर दक्षिणमधून राष्ट्रवादीचा उमेदवार देण्यात आला. त्यामुळे बाळासाहेब विखे पाटील यांची खासदारकी संपुष्टात आली. याला प्रत्युत्तर म्हणून विखे पाटील यांनी रामदास आठवले यांच्याविरुद्ध प्रचार केला आणि रामदास आठवले यांना पराभूत करण्यात विखे पाटील हे यशस्वी ठरले. तसेच अजित पवार अर्थमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील कृषीमंत्री असताना यांच्यातले वाद कायम समोर येत राहिले.

तिसऱ्या पिढीचा संघर्ष

बाळासाहेब विखेंचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यास शरद पवार आले नसल्याने विखे-पवार संघर्षा कुठपर्यंत पोहोचले हे दिसून आले. तसेच आता दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट का पुरवावा असे म्हणत पवारांनी विखेंचा नातू डॉ. सुजय याच्यासाठी नगर लोकसभा मतदारसंघाची राष्ट्रवादीची जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला. त्यामुळे हा संघर्ष टोकाला पोहोचल्याचे दिसते.

आपली प्रतिक्रिया द्या