मल्लिकार्जुन खरगे; मोदी लाटेत तरले, त्सुनामीत वाहून गेले

89

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

आयुष्यात आतापर्यंत एकदाही पराभवाचं तोंड न बघितलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांनाही 2019 च्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. खरगे यांनी आतापर्यंत 11 निवडणुका लढल्या असून या सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला होता. मात्र 2019 ची हवा थोडी वेगळी होती, या हवेने वादळाचे रुप केव्हा घेतले हे खरगेंना कळालेच नाही आणि त्यांचा गड उध्वस्त झाला.

2014 ला मोदी लाट होती, त्या लाटेत अनेकांचे बालेकिल्ले उध्वस्त झाले. मात्र या लाटेतही खरगे यांनी गुलबर्गा मतदारसंघातून विजय मिळवला होता. या विजयामुळेत्यांना काँग्रेसने संसदेतील गटनेते म्हणून निवडले होते. खरगे त्यंची जागा हमखास निवडून आणणारच हा काँग्रेसला आतापर्यंत आत्मविश्वास होता, भाजपने हा आत्मविश्वास खोटा आहे हे काँग्रेसला दाखवून दिले

केंद्रात रेल्वे, रोजगार मंत्रीपद सांभाळलेल्या खरगे यांना भाजपच्या उमेश जाधव यांनी 95,452 मतांनी पराभूत केले आहे. कर्नाटकातील दलित चेहरा म्हणून खरगेंनी त्यांची ओळख निर्माण केली आहे. 2013 साली त्यांचे नाव कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्याही शर्यतीत होते. मात्र काँग्रेसने त्यांना राज्याऐवजी केंद्रात बोलावले.1969 साली खरगेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 1972 साली ते पहिल्यांदा आमदार बनले होते. त्यानंतर 2008 पर्यंत ते सातत्याने आमदारकीची निवडणूक जिंकत राहीले होते. 2009 साली खरगेंना लोकसभेवर पाठवण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला होता. त्या निवडणुकीतही खरगेंनी विजय मिळवला.

कर्नाटकात भाजपने सत्ताधारी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरचा सुपडा साफ केला आहे. 28 जागांपैकी भाजपने 25 जागा जिंकल्या आहेत. माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा हे देखील या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या निकालांमुळे एचडी कुमारस्वामी यांचे सरकार अस्थिर असून ते धोक्यात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या