बाबाची ‘हनी’ गायब, पोलिसांनी जारी केली लूकआऊट नोटीस

सामना ऑनलाईन, हरियाणा

बलात्कारी बाबा राम रहीम याला  सीबीआय न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर पोलिसांनी त्याची लाडकी हनीप्रीत हीचा शोध घ्यायला सुरूवात केली आहे. हनीप्रीतला पोलिसांनी फरार घोषित केलं असून तिच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या नोटीशीमुळे ती देश सोडून पळून जाऊ शकणार नाही असा दावा केला जात आहे. बाबाला अटक केल्यानंतर जो हिंसाचार झाला होता त्या प्रकरणी हनीप्रीतची पोलिसांना चौकशी करायची आहे. हा हिंसाचार हनीप्रीत आणि बाबाच्या अन्य काही साथीदारांनी घडवून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. या हिंसाचारात ३६ जणांचा जीव गेला होता आणि मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं होतं.

हनीप्रीत ही बाबा राम रहीम याची मानलेली मुलगी असल्याचं तो सांगत होता. मात्र या दोघांमध्ये वेगळंच लफडं असल्याचा आरोप हनीप्रीतच्या पहिल्या पतीने केला होता. बाबा राम रहीमच्या चित्रपटात या हनीप्रीतने देखील काम केलं होतं. ती स्वत:ची ओळख परोपकारी, दिग्दर्शक, पापा की परी अशी करून देत होती. ट्विटर आणि फेसबुकवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. हनीप्रीतला अटक झाल्यास बाबा आणि तिने आणखी कायकाय उद्योग केले आहेत त्याचाही खुलासा होण्याची शक्यता आहे.