loksabha 2019 – धार्मिक व सामाजिक सणात राजकीय भाषणावर बंदी – जिल्हाधिकारी

सामना प्रतिनिधी । अलिबाग

निवडणूक काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे व दारूचे आमिष दिले जाते. यासाठी मतदारपर्यंत पैसे पोहचविण्यासाठी निवडणूक काळात वाहनातून पैशाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच दारूच्या विक्रीतही वाढ झालेली असते. हा आचारसंहिता भंग असल्याने लोकसभा निवडणुकीत मात्र यावेळी पैसे वाटप करणाऱ्यांवर तसेच वाइन शॉप व बार मध्ये वाढलेल्या दारूच्या विक्रीवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलीस यंत्रणेला देखील अवैध दारूचे अड्डे पूर्णपणे उध्वस्त करण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभा निवडणूक आचारसंहिताबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी व आपल्याकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षाकडून पैसे व मद्याचे वाटप केले जाते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी तसेच बाहेरून येणाऱ्या रस्त्यावर, महामार्गावर नाकाबंदी, चेकपोस्ट बसविण्यात येणार आहेत. निवडणूक काळात पैशाचे लेनदेन मोठ्या प्रमाणात होत असते. याबाबत वाहनाची तपासणी करून त्यात पैशाची वाहतूक होत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. यासाठी उपजिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी राजीप यांची समिती नेमण्यात आली असून ते याची चौकशी करतील. अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील वाइन शॉप, बार यानी चालू व बंद करण्याच्या वेळा पाळाव्यात. याबाबत उत्पादन शुल्क विभागाला सूचना दिल्या असून जिल्ह्यात वाइन शॉप व बार यांची रोजच्या पेक्षा जास्त विक्री निवडणूक काळात वाढली असेल तर त्याबाबत स्पष्टीकरण वाइन शॉप व बार चालकास द्यावे लागणार आहे. अन्यथा त्याची परवाने जप्त केली जातील. तसेच मद्य बनविणाऱ्या कपन्यांवरही यावेळी नजर राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जिल्ह्यात निवडणुकीसाठी 28 समित्या नेमण्यात आल्या आहेत. त्यांना व विविध पथक प्रमुख अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत . स्थिर पथके, भरारी पथके, व्हिडीओ पथके आणि एक निवडणूक खर्चाविषयक पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आचारसंहिता सुरू होताच जिल्ह्यातील सर्व राजकीय बॅनर्स, पोस्टर, भिंती चित्र काढण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आगामी महत्वाच्या धार्मिक व सामाजिक सणांचा वापर करून कोणीही राजकीय स्वरूपाची भाषणे करू नये असे आवाहनही त्यांनी केले असून यासंदर्भातही जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असणार आहे. विशेषतः शिमगोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी, चवदार तळे येथील कार्यक्रम यामध्ये राजकीय नेते सहभागी होऊ शकतात मात्र त्यांना त्या उत्सवांच्या अनुषंगानेच भाषणे करावी लागतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी सुविधा
जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर पुरेशा सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून ४ हजार दिव्यांग व्यक्तींना त्या व्यवस्थित चालू शकत नाही म्हणून सुविधाही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मतदान केंद्रे अंधारलेली नसावीत याची काळजीही घेण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

किनारी गस्त वाढविली
समुद्र किनारी पोलिसांच्या १३ गस्ती चौक्या असून पुलवामा हल्ल्यानंतर त्यांना सावधगिरीचा इशारा दिलाच आहे. त्यामुळे त्या सक्रिय आहेतच शिवाय काही गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या ४१ जणांना पकडण्यात आले आहे. फरारी गुन्हेगारांची देखील यादी तयार असून त्यावरही कारवाई होत आहे अशी माहिती पोलीस अधिक्षक पारस्कर यांनी पत्रकारांना दिली. पोलीस कर्मचाऱ्यांना देखील अतिशय उदबोधक रीतीने मोबाईलच्या माध्यमातून या निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.