लोकसभेत नेमके चालले आहे काय?

>>नीलेश कुलकर्णी<<

[email protected]

संसद म्हणजे ‘भ्रष्ट लोकांचा अड्डा’, धिंगाणा घालणारी मंडळी अशी संसदेची प्रतिमा बनत असताना लोकसभेत गेल्या आठवड्यात झालेला प्रकार क्लेशदायकच म्हणावा लागेल. काँग्रेसच्या खासदारांनी सभापतींवर कागदाचे बोळे फेकणे असो की ते फेकताना भाजपच्या अनुराग ठाकुर यांनी मोबाईलमध्ये त्यांचे शूटिंग करणे असो सगळेच संतापजनक आहे. ‘संसदेनेच मला घडविले आणि लोकशाहीच्या या सर्वोच्च मंदिराचे पावित्र्य कायम जपा’ असे कळकळीचे आवाहन राष्ट्रपतीपदावरून पायउतार होत असताना प्रणव मुखर्जी यांनी करून काही तास उलटले नाही तोच लोकसभेत झालेले अशोभनीय प्रकार संसदेवरील विश्वास उडण्यास कारणीभूत ठरणारे आहेत. लोकसभेत नेमके चालले आहे काय? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे.

यूपीएच्या काळात संसदेतील गदारोळ, सरकारचा भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार यामुळे जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास डळमळीत झाला होता. या पार्श्वभूमीवर २०१४ मध्ये देशात प्रचंड बहुमताने एक मजबूत सरकार सत्तेवर आले. त्यामुळे या सरकारच्या काळात खरे तर लोकशाहीवरील जनतेचा विश्वास दृढ व्हायला हवा. मात्र तसे होताना सध्यातरी दिसत नाही. सरकार हे करेल काय हाच प्रश्न आहे. लोकसभेच्या सध्याच्या ‘स्टाइल ऑफ फंक्शनिंग’वरून मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. विरोधकांना लोकसभेत बोलूच द्यायचे नाही असा सत्ताधाऱ्यांचा खाक्या दिसतो. विरोधकांनी एखादा खराखुरा मुद्दा उपस्थित केला की भाजपचे खासदार त्यावर तुटून पडतात. ‘टीव्हीवर चमकण्यासाठी वेलमध्ये येऊन गोंधळ करू नका’ असे सभापती सुमित्रा महाजन यांनी सुनावल्यावर काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलेले उत्तर विचारात घेण्याजोगे आहे. ‘सभापती महोदया, विद्यार्थीदशेपासून मी राजकारणात आहे. त्यावेळी कॅमेरेही नव्हते. पाऊणशे वयोमान मी कधीच पूर्ण केले आहे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी काही लटपटी खटपटी करण्यासारखे हे वयही नाही. माझी पूर्ण हयात आंदोलनात गेली आहे’ अशी सडेतोड उत्तरे मिळाल्यानंतर सभापतींवरही गप्प राहण्याची वेळ येते. तीच बाब माकपाच्या मोहंमद सलीम यांची. गोरक्षकाच्या मुद्दय़ावर ते बोलत असताना ‘फार आवाज चढवून बोलू नका’ असे सभापतींनी सुनावले. तेव्हा ‘देशभर गोरक्षकाच्या नावावर जो धांगडधिंगा सुरू आहे त्यावर मी लोकसभेत बोलायचे नाही तर कुठे बोलायचे’ असा खडा सवाल सलीम यांनी केला. पाशवी बहुमत आणि सभागृहातील नियमांचे दाखले दाखवून विरोधकांचा आवाज दाबला जाऊ नये. सभापतींच्या पवित्र आसनावर कागदाचे बोळे फेकणे जितके निषेधार्ह आहे तितकाच या घटनेचे व्हिडीओ शूटिंग करून सोशल मीडियावर फिरविण्याचा अनुराग ठाकुरांचा बालिशपणाही निषेधार्ह आहे. मग आमच्या खासदारांवर कारवाई होते तर अनुरागवर का नाही या  काँग्रेसच्या प्रश्नाचे उत्तर सरकारकडे नाही. गमतीचा भाग म्हणजे अनुराग यांच्यावर कारवाईची मागणी करणारे ‘आप’चे भगवंतसिंग मान यांनीही संसदेच्या सुरक्षेसंदर्भात असेच व्हिडीओ शूट करण्याचा ‘उद्योग’ केला होता. त्याबद्दल त्यांना एका अधिवेशनापुरते निलंबितही करण्यात आले होते. लोकसभेत ‘तारकादळा’तून आलेल्या काही खासदार महिला च्युइंगम खात एखाद्यावर असभ्य कॉमेंट करीत असल्याचे प्रकार होत असल्याचे दिसून येते, मात्र सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. राज्यसभेतही नवनिर्वाचित राष्ट्रपतींनी आपल्या पहिल्याच भाषणात पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंचा उल्लेख न केल्यामुळे गदारोळ झाला. नेहरूंचे नाव न घेतल्याने त्यांचे कर्तृत्व पुसता येणार नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर समाजवादी पक्षाच्या रामगोपाल यादव यांनी राज्यसभेत अप्रतिम भाषण केले होते. त्याचा संदर्भ घेणे तितकेच गरजेचे. ‘मोदींचे सरकार प्रचंड बहुमताने आले याचा आनंद आहे. आमचा सुफडा साफ झाला. राजकारणात हे चालायचेय. मात्र आज जे लाटेवर स्वार होऊन ‘क्राऊड’ लोकसभेत निवडून आले आहे ते खरोखर या पवित्र सभागृहात बसण्यायोग्य आहे काय,’ असा सवाल रामगोपाल यांनी केला होता. दुर्दैवाने रामगोपालांचे वाक्य काळाच्या कसोटीवर उतरताना दिसत आहे.

बत्रा महाशयांपासूनचा ‘खतरा’!

दीनानाथ बत्रा नावाचे महाशय सध्या देशात धुमाकूळ घालत आहेत. पाठय़पुस्तकांमधून रवींद्रनाथ टागोर, मिर्झा गालिब आणि उर्दू वगळले जावे असा सल्ला एनसीईआरटीला देऊन बत्रांनी आपल्या तारे तोडले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून तयार वगैरे झालेले बत्रा हे स्वतःला मोठे शिक्षणतज्ञ, इतिहासकार मानतात. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे ते बालमित्र. यावरून बत्रा किती महान असतील याची कल्पना येईलच! मनोहलाल आणि बत्रासाहेब एकदा गप्पा मारत असताना मनरेगाचे काम चाललेल्या एका ठिकाणी पाणीच पाणी लागले. लगेच बत्रा महाशयांना साक्षात ‘सरस्वती’च प्रकटल्याचा साक्षात्कार झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्रा दंगलीवर त्यांनी पुस्तक लिहिले. तेवढय़ा एका कामगिरीवर व मनोहरलाल यांच्या दोस्तीखातर ते सध्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाशी खेळत आहेत. अखंड हिंदुस्थानची त्यांची परिकल्पना त्यांच्या मातृसंस्थेपेक्षाही जास्त विस्तारलेली आहे. म्यानमार हादेखील हिंदुस्थानचाच भाग आहे यावरही ते ठाम आहेत. बत्रांचा शैक्षणिक वर्तुळातील धुडगूस संसदेपर्यंत पोहचला आणि विरोधकांनी ‘बत्रालीलां’ना वेसण घाला अशी मागणी केली. तसे करणे सरकारच्या दृष्टीनेही हितावहच आहे.

नमस्ते राहुलजी, कैसे है..?

राजकारणात दोन द्यावे आणि दोन घ्यावे लागतात. मात्र राजकारणापलीकडेही एक वैयक्तिक स्नेहाचे नाते राजकीय नेत्यांमध्ये असते. पंडित नेहरूंचे त्यावेळच्या सर्वच राजकीय विरोधकांशी मैत्रीचे संबंध होते. अगदी नाथ पै आणि मधू लिमयेंचे भाषण सुरू झाले की नेहरू सभागृहात थांबायचे किंवा सभागृहात नसतील तर आवर्जून सभागृहात यायचे. बांगलादेश युद्धानंतर इंदिरा गांधींवर अटलींजींनी दुर्गेची उपमा देत स्तुतिसुमने उधळली होती तर चंद्रशेखर यांच्यासोबतची अटलजींची दोस्ती अशीच न्यारी होती. अटलजी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांचे मैत्रीपर्व दिल्लीच्या वर्तुळात असेच गाजले. सुषमा स्वराज यांची सोनिया गांधी यांच्याशी असलेली मैत्री आणि प्रमोद महाजनांचे सोनियांशी कसे सौहार्द होते हे सर्वश्रुत आहे. हा सर्व इतिहास उगाळण्याचे कारण म्हणजे पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात गेल्या आठवड्यात झालेले ‘हाय, हॅलो..!’ मोदी सत्तेत आल्यापासून सत्ताधारी व विरोधकांमधील संवाद जवळपास संपलाच होता. मध्यंतरी सोनियांची प्रकृती ठीक नव्हती. मात्र तब्येतीची ख्यालीखुशाली विचारायची तरी कशी? ‘मोदीजी देखेंगे’ ही एक ‘भीती’. मात्र राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मोदी आणि राहुल यांच्यात संवाद झाल्याने किमानपक्षी कटुता दूर होण्याची चिन्हे आहेत. त्याचे झाले असे की, सेंट्रल हॉलमधील एका कार्यक्रमानंतर मोदी आणि राहुल आमनेसामने झाले. त्यावेळी मोदींनी ‘नमस्ते राहुलजी, कैसे है’ अशी आस्थापूर्वक विचारणा केल्यानंतर राहुल यांनीही ‘मै ठीक हूं सर, आप कैसे है’ अशी पृच्छा केली. ‘देश बदल रहा है’ असे आपण रोजच ऐकतो.  देश बदलेल तेव्हा बदलेल. किमान कटुतेचे राजकारण तरी या मोदी-राहुल संवादामुळे बदलावे हीच माफक अपेक्षा.