वास्तवदर्शी साहित्यिक व लोकशाहीर

>>पांडुरंग मामीडकार<<

आपल्या लेखणीचा वापर जातीअंताच्या लढय़ासाठी करून आणि समताधिष्ठत समाजनिर्मितीच्या ध्यासाने प्रवृत्त होऊन अण्णाभाऊंनी तमाम शोषित, वंचित लोकांचे, राबणाऱ्यांचे दुःख जगाच्या वेशीकर टांगण्यासाठी साहित्यनिर्मिती केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जग बदलण्याचे स्वप्न हृदयाशी बाळगून आपली वाणी व लेखणी झिजवली. गुलामीच्या, जातीभेदाच्या व अस्पृश्यतेच्या विरोधात त्यांनी रणशिंग फुंकले. त्या बहुजन नायक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त

देशातील समाजव्यवस्था ही वर्णव्यवस्था व जातीव्यवस्थेच्या नावावर बरबटलेली आहे. हिंदू धर्मातील प्राचीन ग्रंथांचा, पुराणांचा, वेदकाव्यांचा सोयीचा अर्थ लावून धर्ममार्तंडांनी अक्षरशः कहरच केला. अगदी अलीकडे म्हणजे पेशवाईच्या काळात स्पृश्य-अस्पृश्यतेचा तर कळसच झाला होता. अस्पृश्यांना गावाबाहेर वस्ती करावी लागली. दिवसभर जनावरांसारखे काम करूनही हा समाज पोटभर अन्नाला महाग होता. अनेक शतकांपासून वर्णव्यवस्थेच्या नावाने जो अन्याय केला गेला आहे, त्याची कल्पनाच करता येणार नाही. या अस्पृश्य जातीत जन्म घेणे आणि जीवन जगणे, ही साधी गोष्ट नव्हती. याच काळात अतिशुद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजात एक धगधगता अंगार जन्माला आला. गावाच्या वेशीबाहेर उपेक्षित, वंचित आणि शापित आयुष्य जगणाऱ्या जातीत जन्माला येऊन वर्तमान समाजव्यवस्थेत गुलामीच्या, जातीभेदाच्या व अस्पृश्यतेच्या विरोधात ज्यांनी रणशिंग फुंकले ते बहुजन नायक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होत.

अण्णाभाऊ साठे हे त्यांच्या कथा-कादंबऱ्यांसाठी मराठी साहित्यसृष्टीत नावाजलेले असले, तरी लोकशाहीर म्हणून त्यांचा अधिक नाकलौकिक आहे. क्रांतिकारी विचारांचा समाजामध्ये प्रचार-प्रसार व्हावा, या उद्देशाने अण्णाभाऊंनी आपले लेखन केले.  सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय व दलित जीवनावरील कथा, गुन्हेगारी जीवनाचे चित्रण करणाऱ्या कथा, आत्मचरित्रात्मक कथा, प्रेम कथा, कौटुंबिक कथा, शोक कथा असे साहित्याचे एक ना अनेक प्रकार हाताळले. तथापि, समाजातील उपेक्षित व पददलितांच्या जीवनाचे वास्तक चित्रण त्यांनी आपल्या साहित्यामधून केले.

महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता व सामाजिक न्यायाच्या विचारांची, परिवर्तनाची चळवळ अण्णाभाऊंनी आपल्या साहित्य निर्मितीतून पुढे नेली. अण्णाभाऊ साठे हे उपजतच प्रतिभा लाभलेले हाडाचे कलावंत असल्यामुळे आपल्या भावनांना ते कलेद्वारे वाट मोकळी करून देत होते.  अण्णाभाऊंच्या  शाहिरीचा आधार त्यांच्या कथांचा आधार, गुलामगिरीच्या गर्तेत रुतलेला उपेक्षित माणूस होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ याच माणसांसाठी होती. एकूण तथागत गौतम बुद्धांनी मानवाला केंद्रबिंदू मानून आरंभिलेल्या मानवमुक्तीचा किचार अण्णाभाऊंनी अंगीकारला असल्याचे जाणवते. मनोरंजनातून प्रबोधन व प्रबोधनातून परिकर्तनाचा संदेश अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीतून दिला.

या देशातील जातीयवाद व त्यावर आधारित दलित महिला, आदिवासी, कामगार आदीवर होणारे अन्याय, अत्याचार संपुष्टात येण्यासाठी आणि जातीअंत घडवून आणण्याचा महत्त्वाचा मार्ग म्हणजे आंतरजातीय विवाह होय, असा विचार महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला आणि या पुरोगामी महात्म्यांच्या या विचारांचा धागा अण्णाभाऊंच्या साहित्यकृतीत सापडतो. ती साहित्यकृती म्हणजे ‘आवडी’ ही कादंबरी होय. उच्च जातीतील आवडी चौगुले व एकेकाळी मागास समजल्या जाणाऱ्या जातीतील धनाजी रामोशी यांच्या प्रेमाची व आंतरजातीय विवाहाची ही कथा आहे.

आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून जातीअंताचा संदेश देणारी ही कादंबरी आहे. अण्णाभाऊंच्या बारबंद्या वंजारी कथासंग्राहात जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांच्या अनेक कथा आहेत. हिंदुस्थानी समाजव्यवस्थेने दिलेली या माणसांच्या जीवनातील दुःखे, दरिद्री, असहाय्यता, संघर्ष, अंधश्रद्धा त्यांची व्य सने आदींचे चित्रण या कथासंग्रहात केले आहेत.

धनवंतांनी अखंड पिळले धर्मांधांनी तसेच छळले

मगराने जणू माणिक गिळले चोर जाहले साव

ठरवून आम्हा हीन कलंकित जन्मोजन्मी करूनी अंकित

जीणे लादून कर अकमानित निर्मून हा भेदभाव

जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव

जातीचे व कर्गाचे अन्यायकारी समीकरण बदलले पाहिजे आणि ते भीमरावाप्रमाणे घाव घालून बदलले पाहिजे, असा विचार अण्णाभाऊ मांडतात. म. फुले क डॉ. आंबेडकर यांचा उल्लेख हाच अण्णाभाऊंच्या या देशातील जातीय, धार्मिक वास्तवांच्या जाणिवेचा व जात, धर्म यांच्यामार्फत चालणाऱ्या अन्यायाचा व या अन्यायाच्या विरोधातल्या आवाजाचा पुरावा आहे.

प्रतिभा आणि गुणकत्ता ही कोणा विशिष्ट जातीची अथवा धर्माची मिरासदारी कधीच असत नाही हे आपल्या वाणी लेखणीतून सिद्ध करून दाखविणारे अण्णाभाऊ साठे होत. संत तुकारामांनी तुकाराम गाथा लिहिली तर काटेगावच्या  तुकारामाने बहुजनांची बहुजन गाथा मांडली. स्त्रीचे शील, सामाजिक समता, पुरुषाचा स्काभिमान आणि देशाचे स्वातंत्र्य हा अण्णाभाऊंच्या साहित्याच्या मूळ स्वरूपातील गाभा होता. त्यांनी एकूण ३२ कादंबऱ्या, १४ कथासंग्रह, ११ पोवाडे, १४ लोकनाटय़, इनामदार नावाचे एक नाटक आणि शेकडो लावण्या, गीते (क्रांतिगीते, वीरगीते, महाराष्ट्र गीते, कामगार गीते) लिहिले.

आपल्या लेखणीचा वापर जातीअंताच्या लढय़ासाठी करून आणि समताधिष्ठत समाजनिर्मितीच्या ध्यासाने प्रवृत्त होऊन अण्णाभाऊंनी जगातल्या तमाम शोषित, उपेक्षित, वचित लोकांचे, राबणाऱ्यांचे दुःख जगाच्या वेशीकर टांगण्यासाठी साहित्यनिर्मिती केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जग बदलण्याचे स्वप्न हृदयाशी बाळगून आपली वाणी व लेखणी झिजवली. आपण सर्व जण अण्णाभाऊंचा हाच समताधिष्ठत समाजनिर्मितीचा मानकतावादी वसा आणि वारसा पुढे चालवायला हवा.

(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक मुजफ्फर हुसेन यांचे दर मंगळवारी प्रसिद्ध होणारे पडसादहे सदर काही अपरिहार्य कारणामुळे प्रसिद्ध होऊ शकणार नाही.)