लोणावळा-पुणे-सांगली रेल्वे घातपाताचा कट

9
maharashtra-express

सामना ऑनलाईन । पुणे

मध्य रेल्वेच्या पुणे विभागात रुळांवर लोखंडी सळय़ा, लोखंडी प्लेट ठेवून भयंकर अपघात घडविण्याचा प्रयत्न वर्षभरात सहा वेळा झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. लोणावळापासून पुणे-सांगली-हातकणंगलेपर्यंत या घटना घडल्या असून यामागे भयंकर घातपाताचा कट असण्याची शक्यता आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस यंत्रणेला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागात चार जिह्यांचा समावेश असून 74 लहानमोठी स्थानके आहेत. दररोज सुमारे 2 लाख  प्रवाशांची ये-जा होते. त्यामध्ये  600 किलोमीटर  रेल्वे लाइनचा समावेश आहे. दरम्यान, रेल्वेचा अपघात करण्याच्या उद्देशाने मागील वर्षभरात विविध ठिकाणांच्या रुळांवर  लोखंडी  वस्तूंच्या आधारे घातपाताचा प्रयत्न केला आहे. प्रामुख्याने डिसेंबर 2018 मध्ये काही मुलांनी अदरकी-वाठार स्थानकांदरम्यान रेल्वे रूळ पटरीच्या मध्यभागी लोखंडी प्लेट टाकल्या होत्या. त्यामुळे प्लेटला धडकून इंजिनची सहा चाके रुळांवरून घसरली होती.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागात 74 स्थानके असून काही स्थानकांदरम्यान रुळांवर लोखंडी वस्तू ठेवून रेल्वेचा घातपात करण्याचा सहा वेळा प्रयत्न झाला आहे.  वाठार स्थानकादरम्यान अल्पवयीन मुलांनी रुळांवर 20 लोखंडी सळ्या ठेवल्या होत्या. त्यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची हमीपत्रानंतर सुटका झाली. नागरिकांनी अशा घटनांची माहिती देण्यासाठी 1082 क्रमांकावर संपर्क साधावा.

डी. विकास, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे पुणे विभाग

वर्षभरातील सहा घटना

  • एप्रिल-मे 2018 ठिकाण : रुकडी-हातकणंगले रेल्वे रूळ
  • दोन्ही रेल्वे स्थानकांदरम्यान वेगवेगळ्या ठिकाणांवरील रुळांवर लोखंडी तुकडे ठेवून अपघात घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र लोको पायलटने प्रसंगावधान राखून वेळीच आपत्कालीन बेक लावल्याने दोन्ही अपघात टळले.
  • ऑक्टोबर 2018, ठिकाण :नंद्रे-सांगली विभाग
  • मध्य रेल्वेच्या नंद्र-सांगली विभागात रेल्वे रुळांवर 20 पेक्षा अधिक लोखंडी सळ्या ठेवण्यात आल्या होत्या, मात्र लोको पायलटच्या प्रसंगावधानाने अपघात टळला.
  • 2 डिसेंबर 2018,  ठिकाण  : वाठार स्टेशन
  • अदरकी-वाठार रेल्वे स्थानकांदरम्यान काही अल्पवयीन मुलांनी रूळ आणि पटरीच्या मध्यभागी लोखंडी प्लेट टाकल्या होत्या. त्यामुळे प्लेटला इंजिन धडकल्याने सहा चाके घसरली होती. रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. यासंदर्भात वाठार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
  • डिसेंबर 2018, ठिकाण : देहू रोड स्टेशन
  • मध्य रेल्वेच्या देहू रोड रेल्वे स्थानकादरम्यान रुळांवर लोखंडी तुकडा ठेवण्यात आला होता, मात्र लोखंडी तुकडा इंजिनला धडकल्याने मोठा अपघात टळला.
  • एप्रिल 2019, ठिकाण :तळेगाव-कामशेत रेल्वे स्थानकांदरम्यान
  • तळेगाव-कामशेत रेल्वे स्थानकांदरम्यान हैदराबाद-मुंबई एक्प्रेस रेल्वेला लक्ष्य करण्यात आले होते. त्यानुसार रुळांवर लोखंडी तुकडा टाकण्यात आला होता, मात्र लोको पायलटने आपत्कालीन बेक दाबल्याने अपघात टळला.
आपली प्रतिक्रिया द्या