बँकांचे कर्ज फेडतो, पण…करदात्यांच्या पैशांवर खटला लढवू नका!

1

सामना ऑनलाईन। लंडन

किंगफिशर एअरलाईन खड्डय़ात घालून बँकांचे कोटय़वधी बुडवणाऱया फरार उद्योगपती विजय मल्ल्याने आता उलटय़ा बोंबा मारायला सुरुवात केली आहे. बँकांचे कर्ज फेडतो पण करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करू नका, त्यांच्या पैशांवर खटला लढवू नका, असे आवाहन त्याने ट्विटरवरून केले आहे.

जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यापासून मल्ल्याने हिंदुस्थानी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. एअर इंडियाला 35 हजार कोटींचे पॅकेज देऊन सरकारने वाचवले तसे धोरणबद्दल राबवणे शक्य झाले असते, असेही तो म्हणाले. एसबीआयच्या अध्यक्षतेखालील सार्वजनिक बँका कर्जवसुलीसाठी माझ्या मागे लागल्या आहेत. माझ्याविरोधात ब्रिटनमध्ये खटला दाखल केला आहे. हा खटला हिंदुस्थानच्या करदात्यांच्या पैशावर लढला जात आहे. हिंदुस्थानने माझ्य़ाविरोधात जप्तीची कारवाई करत सर्व थकीत रक्कम वसूल केली आहे. स्वतः पंतप्रधानांनी त्याचा खुलासा केला आहे, अशी अक्कलही त्याने पाजळली आहे.

मल्ल्याची आर्थिक कोंडी
लंडनमधील आयसीआयसीआय यूके बँकेत मल्ल्याच्या खात्यात सुमारे 2 लाख 60 हजार पौंड इतकी रक्कम जमा आहे. या रकमेतून कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी हिंदुस्थानी बँकांना रोखण्याचा प्रयत्न मल्ल्याने केला होता. मात्र, ब्रिटनच्या हायकोर्टाने त्याची याचिका फेटाळल्याने त्याला खात्यातून पैसे काढता आले नाही.

‘एसबीआय’चीच उलटतपासणी
हिंदुस्थानी करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करत हिंदुस्थानी वकील ब्रिटनमध्ये चमकण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे उत्तर एसबीआयने दिले पाहिजे. मीडियाला खळबळजनक हेडलाइन हवी असते. पण ब्रिटनमधील वकिलांवर किती पैसा खर्च केला जात आहे, हे कोणीतरी आरटीआयच्या माध्यमातून विचारायला हवे. ही माहिती पुढे का येत नाही. मी तर सर्व रक्कम फेडायला तयार आहे, असेही तो म्हणाला.