यवतमाळ जिल्ह्यातही होता समुद्र, संशोधकांचा दावा

सामना ऑनलाईन । यवतमाळ

मथळा वाचून आश्चर्य वाटलं असेल ना? दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या विदर्भातील यवतमाळ जिल्हा आणि समुद्र यांचा परस्परांशी कसा काय संबंध असू शकतो, असा प्रश्नही तुम्हालाही पडला असेल. पण समुद्री भागात आढळणारे शंख-शिंपले यवतमाळ जिल्ह्याच्या कोंडी जंगलात जीवाश्माच्या स्वरूपात आढळल्याने प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे. हजारो वर्षापूर्वीच्या या शंख-शिंपल्यांचे रूपांतर खडकात झाले असून, जीवाश्मांचे खडकच्या खडक या टेकडीवर दिसत आहेत. त्यामुळे चार हजार वर्षापूर्वी हा परिसर समुद्र असावा, याला पुष्टी मिळाली आहे.

fossils-yavatmal-2

नैसर्गिक वनसंपदेने समृद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात अनेक रहस्य दडलेली असून, त्यातीलच एकाचा शोध पांढरकवडा येथील मोघे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. विजय वातिले यांनी लावला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातल्या ताडउमरी रस्त्याने जाताना कोंडी टेकडी लागते. जंगलात अर्धा किलोमीटर आत ही टेकडी असून या टेकडीवरील खडक हे जीवाश्माचे आहेत.

fossils-yavatmal-1

समुद्रात आढळून येणाऱ्या कोट्यवधी शंख आणि शिंपल्यांचे रूपांतर खडकात झाले आहे. शिंपल्यांचे खडक टेकडीवर दिसतात. झरीजामणी तालुक्यातील माथार्जुनपर्यंत अंतराअंतरावर असे शंख-शिंपले आढळून येतात. त्यामुळे चार हजार वर्षांपूर्वी हा भूभाग समुद्र असण्याची शक्यता प्रा. वातिले यांनी वर्तवली आहे. ज्वालामुखी आणि भूकंप झाल्याने आतील भाग वर येऊन जलाशय मागे लोटला गेला व हजारो समुद्रजीव नष्ट झाले. त्याचा पुरावा या टेकडीवरील जीवाश्म देतात, असंही डॉ. वातिले यांनी सांगितलं.