लोणी मावळा बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींचा शुक्रवारी फैसला

सामना प्रतिनिधी । नगर

लोणी मावळा बलात्कार व खून प्रकरणात आरोपींनी कट-कारस्थान करून मुलीवर अत्याचार केला आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसली, तरी भविष्यात ते गुन्हे करणार नाहीत, याची शाश्वती नाही. या घटनेत मुलीच्या अंगावर जखमा आढळल्या आहेत. तिच्यावर अत्याचार झाल्याचा पुरावा सरकारी पक्षाने सिद्ध केला आहे. त्यामुळे या घटनेतील तीनही आरोपींना मृत्युदंडाचीच शिक्षा मिळावी, अशी मागणी सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाकडे केली आहे. दरम्यान, या खटल्यातील आरोपींना शुक्रवारी शिक्षा सुनावली जाणार असल्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी दिला आहे.

लोणी मावळा बलात्कार व खून प्रकरणात संतोष लोणकर, मंगेश लोणकर, दत्तात्रय शिंदे या तिघांवर अत्याचार व खुनाचा आरोप काल निश्चित झाला होता. आज या आरोपींच्या शिक्षेबाबत दोन्ही पक्षांच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. तीनही आरोपींना यावेळी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

आरोपींच्या वकिलांनी आरोपींचे वय व इतर बाबी लक्षात घेता, त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने ‘तुमच्यावर दोषारोप सिद्ध झाले आहेत. तुमचे म्हणणे सांगा,’ असे विचारले. यावर आरोपी आमची परिस्थिती, तसेच आमच्या मुलाबाळांचा विचार करावा, असे म्हणाले.

सरकारी पक्षाच्या वतीने ऍड. उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, लोणी मावळा येथील शाळेत शिकणाऱया मुलीला रस्त्यामध्ये अडवून तिला चारीजवळ ओढत नेण्यात आले. आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. तिच्या डोक्यात क्रू ड्रायव्हरने वार केले. यातील आरोपी क्रमांक १ ने तिच्यार तोंडात चिखल कोंबला, तर दुसऱयाने तिला दगडाने मारले व एकाने हात-पाय ओढून अत्याचार करून तिला ठार मारले. पीडित मुलीच्या डोक्यावर, छातीवर व गुप्तांगावर असलेल्या जखमांबाबतचे सर्व पुरावे न्यायालयामध्ये सिद्ध झाले आहेत. आरोपींमध्ये विकृती आहे. त्यांनी पीडित मुलीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, ही बाब गंभीर आहे. आरोपी वेडसर, भोळसर नाहीत, त्यांना पश्चात्तापसुद्धा झालेला नाही.

ऍड. निकम यांनी संस्कृतमधील श्लोक सादर करून अशा प्रकरणांमध्ये यापूर्वी पंजाब येथील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कशा पद्धतीने शिक्षा दिली, याचे दाखले दिले. प्रत्येक गुन्हेगार नार्को टेस्ट करा, असेच म्हणतो. मात्र, न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून आरोपींना मृत्युदंड द्यावा, अशी मागणी न्यायालयासमोर केली.

दरम्यान, या प्रकरणाचा निकाल शुक्रवारी (दि. १०) ठेवण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी दिला आहे.