लोणावळा दुहेरी हत्या प्रकरणाचा छडा; २ जण ताब्यात

10


सामना प्रतिनिधी । लोणावळा

संपूर्ण महाराष्ट्र हलवून सोडलेल्या लोणावळा दुहेरी हत्या प्रकरणाचा उलगडण्यात सव्वादोन महिन्यांनी पोलिसांना यश आलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी दोघांना आज (रविवारी) ताब्यात घेतले आहे.

असिफ शेख व सलिम शेख उर्फ सँन्डी (दोघेही रा. लोणावळा) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी हे नशेखोर असून किरकोळ पैशासाठी हा खून झाल्याचे समजते. लोणावळा आयएनएस शिवाजी समोरील एस पॉईंट डोंगरावर २ एप्रिल रोजी रात्री हा सगळा प्रकार घडला होता. सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्गात शिकणारा सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे या दोघांची दगडाने व अज्ञात हत्याराने डोक्यात व शरीरावर वार करून हत्या करण्यात आली होती. ३ एप्रिल रोजी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर लोणावळा शहरासह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधिक्षक सुवेझ हक, अतिरिक्त अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील १४ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या ८ तपास पथकांनी घटनास्थळ व परिसर पिंजून काढला. तपासादरम्यान दीड लाख फोन कॉल्स, मयत युवक व युवती यांचे मित्र, रेकॉर्डवरील गुन्हेगार, फोन कॉल्सवरील संशयित अशा जवळपास दोन हजारांहून अधिक जणांची चौकशी केली होती. एवढ्या दीर्घ तपासानंतर पोलिसांना हे यश मिळालं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या