दोन महिलांची सहा लाखांची फसवणूक

सामना प्रतिनिधी, नाशिक

कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने दोन महिलांकडून सहा लाख रुपये उकळले. त्याने पैसे परत न देता, बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची, तसेच मुलीच्या चेहऱ्यावर ऑसिड फेकण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

वसंत धोंडीराम कोल्हे याने नेहरूनगर येथील सुमन विलास निंबाळकर यांच्याकडून गृहकर्ज मंजूर करून देण्यासाठी चार लाख रुपये घेतले होते. मेहता हायस्कूलजवळील मंदाकिनी उल्हास भोईर यांना मुलीसाठी शैक्षणिक कर्ज मिळवून देतो, असे सांगून दोन लाख हडप केले. १३ जुलै ते २० सप्टेंबर या काळात धनादेशाद्वारे त्याने हे पैसे घेतले, मात्र काम झाले नाही म्हणून दोघींनी पैसे परत मागितले असता त्याने धमकावले, अशी तक्रार दोघींनी उपनगर पोलिसांकडे केली होती. आता न्यायालयाच्या आदेशाने कोल्हेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.