संभाजीनगरात ‘लव्ह जिहाद’, अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण

1
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजीनगरात ‘लव्ह जिहाद’चे पेव फुटले असून, महाविद्यालयात जाणाऱ्याी एका अल्पवयीन हिंदू मुलीला हेरून लग्नाचे आमिष दाखवत अपहरण केल्याची संतापजनक घटना रेल्वे स्टेशन भागात घडली. या प्रकरणी सातारा पोलीस तपास करण्यास टाळाटाळ करीत असल्याने हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

रेल्वेस्टेशन परिसरातील अल्पवयीन मुलगी रेल्वेस्टेशन रोडवरील नामांकित महाविद्यालयात १२ वीत शिक्षण घेते. याच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सातारा परिसरातील एका तरुणाने तिच्याशी प्रेमाचे नाटक करून तिला प्रेमजाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून जुनैद याने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दुचाकीवर बसवून तिचे अपहरण केले. मुलगी घरी न परतल्याने उशिरा तिच्या आईने मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात दिली. पोलीस निरीक्षक भरत काकडे यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी जुनैद यानेच मुलीचे लग्नासाठी अपहरण केल्याच्या दिशेने तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, मुलीचे अपहरण होऊन ३ ते ४ दिवस उलटले तरीही मुलगी घरी न परतल्यामुळे तिचे कुटुंब हैराण झाले असून, आपल्या मुलीचा तातडीने तपास लावावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.