गोष्ट आमच्या प्रितीची

क्षितिज झारापकर,[email protected]

चित्रपट-मालिकांमधील सेलिब्रिटी जोडी रिअल लाइफ जोडी असणं सगळ्यांच्याच परिचयाचं आणि उत्सुकतेचंसुद्धा. आपल्या मराठी नाटकातील अशीच थिएटर लाइफ ते रिअल लाइफ जोडी म्हणजे लीना भागवत-मंगेश कदम. नाटक हा दोघांचाही श्वास… पहिलं प्रेम… आणि बरंच काही… नाटकाच्या या पहिल्या प्रेमातून लीना आणि मंगेशची प्रेमकथाही उमलली… फुलली…

 एके दिवशी एका नाटकाची तालीम संपते अणि सगळे घरी जायला निघतात. दिग्दर्शक नाटकातील हिरॉईनला बाजूला नेतो आणि सांगतो की ‘नाटक ही माझ्या आयुष्यतली पहिली प्रायोरिटी आहे… पण दुसऱया प्रायोरिटीवर नेहमी तू असशील… लग्न करशील माझ्याशी?’ हा दिग्दर्शक होता मंगेश कदम आणि हिरॉईन लीना भागवत. इथून सुरू होते ती मराठी रंगभूमीच्या या सेलेब्रिटी दांपत्याची कहाणी. दोघेही एकाच क्षेत्रातले असल्याने त्यांचं सांसारिक अणि व्यावसयिक आयुष्य वेगवेगळं नाही हे लीना आवर्जून सांगते. मंगेश कलाक्षेत्रातचं कार्यरत असल्याने लीनाच्या कामाबाबत त्याला पूर्ण कल्पना असते. त्यामुळे दोघांच्या संसारात तिची कसरत वगैरे होत नाही. मुळात प्रेमविवाहच असल्याने कांदेपोह्यांचा प्रयोग मिस झाला होता. आता दुपारी शिवाजी आणि रात्री कल्याण असे प्रयोग करून बोरिवलीला घरी आल्यावर दुसऱया दिवशी सकाळी मंगेश गरमागरम कांदेपोहे एक्सपेक्ट करत नाही. हे दांपत्य एक सेलिब्रिटी जोडपं असलं तरी कुठेतरी ते एक तुमच्याआमच्यासारखं मराठमोळं नवराबायकोचंच गणित आहे. एकाच क्षेत्रात काम करत असल्याने त्यांना संसार कदाचित थोडा सोपा जात असेल. पण नवऱयाने माझी बायको प्रतिभावान आणि सक्षम अभिनेत्री आहे म्हणणं आणि बायकोने एक प्रस्थापित दिग्दर्शक माझा नवरा आहे हे मानणं यातलं गणित या दोघांना व्यवस्थित साधता आलंय.

लीनामधली अभिनेत्री मोठी की बायको असं विचारल्यावर मंगेश एका धूर्त नवऱयासारखा पटकन सांगतो की बायको. प्रस्थापित दिग्दर्शक असला तरी मंगेश कदम एक मराठमोळा नवरा आहे. अभिनेत्र्या बऱयाच मिळतील, बायको एकच आहे याचं भान त्याने ठेवलं असं वाटेपर्यंत तो पुढे सांगतो की, लीना आयुष्यात येण्याआधी माझं आयुष्य तडाखेबंद नव्हतं. एखाद्या वॅगॅबॉन्डसारखा कलेच्या जगात हिंडत होतो. लीनामुळे आयुष्य सुनियोजित झालं. अभिनेत्री म्हणून ती समर्थ आहेच. तिने रंगभूमीच नाही तर टेलिव्हिजन मालिकांमध्येही दीर्घकाळ स्मरणात राहतील अशाच भूमिका केल्या आहेत. पण बायको म्हणून माझ्या आयुष्यातील तिचं योगदान खूप मोठं आहे.

मंगेशच्या मते त्यांच्या आयुष्यातून नाटक काढून टाकलं तर ते दोघे हे एक खूप बोअरिंग जोडपं आहे. रंगकर्मींकरता त्यांची कला ही सर्वात रोमहर्षक (रोमारोमाला हर्षित करणारी) गोष्ट आहे हे ऐकून होतो. पण इथे मात्र मंगेश अणि लीना त्यांची कला ही त्यांच्यासाठी आयुष्यातील रोमान्स असल्याचं सांगत होते. मला उगीचंच वाटून गेलं की मग अकाउन्टस् सेक्शनमध्ये काम करणारं जोडपं असेल तर त्यांनी फावल्या वेळातही हिशेब करण्यात रोमान्स असेल का? लीनाने लगेच शंकेची उकल केली. आपल्याला एखाद्या विषयाचा ध्यास, आणि तेच ध्येय जर जोडीदाराचं असेल तर दोघांमधल्या प्रेमाला खूप मोठा आधार मिळतो.

मंगेश आणि लीनाची ही रिलेशनशिप म्हणजे एखाद्या ऑफिसमध्ये हाताखालच्या एका मुलीने बॉसशी लग्न करण्यासारखं आहे. आता बॉसकडे इतका तगडा वशिला असल्यावर कामातही आधार वाटणारच ना. पण मंगेशला प्रयोगात माझी अर्धी स्टेपही चुकलेली चालत नाही. तो खूप चिडतो मग. लीना सांगत होती. मला प्रश्न पडला की इतर नटय़ा जर चुकल्या तर मंगेशमधला दिग्दर्शक असाच रिऍक्ट होतो का? मंगेश म्हणतो की कदाचित नाही. कारण लीना तिच्या कामात परफेक्शनिस्ट आहे. म्हणून तिच्या चुकांचा अधिक राग येतो. आमच्या नात्याचा मी वापरही करतो. हिला रागावता येतं तितकं इतरांना नाही. म्हणून मी लेकी बोले सुने लागे असा उपयोगही करतो अधूनमधून. पण मंगेश प्रयोगात बरोबर असण्याचे फायदे खूप असतात. लीना पुढे सांगते. नाटकाचा शो हा एक प्रयोगच असतो. त्यात चुका या होतातच. पण प्रत्येकवेळी त्यावर मात करायला मंगेशचा दांडगा अनुभव बरोबर असणं खूप उपयोगी असतं. अणि त्यात पुन्हा आम्हाला एकमेकांना सगळं सांगावं लागत नाही. ते कळतं. नवराच सहकलाकार असल्याने कम्फर्ट लेव्हलही मस्त असते.

मंगेश हा १०० टक्के नाटय़कर्मी आहे. तो नाटक सोडून दुसरं काही कधी करेल असं वाटत नाही. मी ९९ टक्के नाटय़कर्मी आहे. म्हणून मला कधी कधी एखाद्या मालिकेतील चांगली भूमिका किंवा चांगलं अर्थकारण भूल घालतं. पण मंगेशला अनेकदा विचारणा होऊनही त्याने त्या दिशेला जाणं टाळलं. कारण माझी मानसिकता ती नाही, नाटकाची आहे असं मंगेश सांगतो. आणि अर्थकारण त्याला तितकंसं महत्त्वाचं वाटत नाही. तो म्हणतो की आपण ज्या विश्वात कार्यरत आहोत त्यात आपण सतत अपॉर्च्युनिटीज तयार करत राहायला हवं. प्रकाश बुद्धिसागरांकडे असिस्टंट म्हणून काम करत असताना मी त्यांना नाटकं शूट करण्याचं सुचवलं आणि आम्ही नाटकांच्या सीडीजचं एक वेगळं नवीन मार्केट निर्माण केलं. गरजा सीमित ठेवणं हे गणित त्याला गवसलंय.

कांदे-पोहे जरी एक्सपेक्टेड नसले तरी नवरा बायकोच्या एकमेकांकडून अपेक्षा असतातच. त्याचं काय? मंगेश म्हणतो की तिच्या हातचा वरणभात आणि बटाटय़ाच्या काचऱया मी कितीही आणि कधीही खाऊ शकतो. त्याच्या मते हे दोघे एकमेकांसाठी परफेक्ट मिसमॅच आहेत. यावर लीना सांगते की, माणसं आपल्यात जे नाही ते जोडीदारात शोधतात. मंगेश लगेच याला दुजोरा देतो. इथेच हे दोघे दाम्पत्य म्हणून की पूरक आहेत हे दिसून येतं. लीना खूप आक्रमक आणि स्पष्टवक्ती आहे, पटकन चिडते. पण मी मुळात मुखदुर्बळ. आम्ही दोघं म्हणूनच एकमेकांना सप्लिमेन्ट नाही कॉम्प्लिमेन्ट करतो. ती जेव्हा माझ्यावर चिडते तेव्हा मात्र गप्प बसणे हाच पर्याय सर्वात रास्त असतो. हे मात्र युनिव्हर्सल आहे. जगातले तमाम नवरे हा उपाय अत्यंत सक्सेसफुल्ली वापरतात. पण लीना खूपच चिडली तर काय? मंगेश हळूच सांगतो की गपचूप तिला पाहायचा असलेल्या एखाद्या चित्रपटाची तिकीटं काढून आणायची आणि भांडण संपवायचं.