चुलत बहिणीवर प्रेम जडलं, तरुणाच्या खूनानंतर खळबळ

23
murder

सामना ऑनलाईन । सेलू

चुलत बहिणीशीच झालेल्या प्रेम प्रकरणातून एका तरुणाचा खून झाल्याची घटना गुगळी धामणगाव येथे सोमवारी उघडकीस आली. मुलींच्या घरच्या मंडळींनी त्याचा खून केल्या आरोप मुलाच्या आई-वडिलांनी केला आहे.

पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार हा मुलगा कामाच्या शोधात 6 मे रोजी मुंबई येथे गेला होता. त्यानंतर 13 मे रोजी त्याची चुलत बहीण त्याच्याकडे मुंबईला निघून गेली. या घटनेनंतर मुलाच्या वडिलांनी त्या दोघांना गावी बोलवून घेतले. दोघांची विचारपूस केल्यावर त्या दोघांमध्ये प्रेम प्रकरण असल्याचे उघड झाले. त्याच्या वडिलांनी त्या दोघांची आणि आपला चुलत भाऊ आणि वहिनी यांची समजूत काढून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र 17 मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुलीच्या वडिलांसह 7 जण आनंदच्या घरी आले. त्यांनी घरासमोर धिंगाणा घालत शिवीगाळ केली. खून झालेल्या त्या मुलास दोन जणांनी बळजबरीने मोटर सायकलवर बसवून त्याच्या वडिलांना सांगितले की, ‘याने प्रेम प्रकरण केले आहे. म्हणून आम्ही त्याची नसबंदी करण्यासाठी कोल्हा येथे घेऊन जात आहोत’. त्यावेळी मुलाच्या वडिलांनी आणि कुटुंबीयांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता मुलीच्या कुटुंबीयांनी मारहाण व शिवीगाळ करून तुम्हाला खतम करू, अशी धमकी दिली. तसेच मुलाला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून घेऊन गेले. रात्री पर्यंत मुलगा घरी न आल्याने तो बेपत्ता असल्याची तक्रार सेलू पोलिसात दाखल करण्यात आली होती. सोमवारी 20 रोजी आम्ही सेलू पोलीस ठाण्यात असताना समजले की, मुलाचे तिडी पिंपळगाव शिवारातील विहिरीत प्रेत सापडले आहे. मुलाच्या पाठीत धारदार हत्यार खूपसून मृतदेह विहिरीत टाकल्याचे आढळले.

सात व्यक्तींनी जबरदस्ती पळवून नेऊन माझ्या मुलाचा खून करून विहिरीत टाकले, असा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. या फिर्यादीवरून सेलू पोलिसात आरोपीं विरूद्ध खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संदिपान शेळके हे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या