मृग नक्षत्राचा आठवडा कोरडा, शेतकरी चिंतेत

69

सामना प्रतिनिधी, राहुरी

9 जूनला ठराविक वेळात झालेल्या पावसाचा अपवाद वगळता मृग नक्षत्रातील आठवडा कोरडा गेल्याने राहुरीच्या शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढली आहे. यंदा 9 जूनला ठराविक वेळात पावसाने हजेरी लावली आसुन राहुरी 10 मिलीमीटर, मुळानगर 5 मिलीमीटर, कोतुळ 22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात सुरू झालेले रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्याने मृग नक्षत्रात पाऊस पडेल ही भाबडी आशा शेतकरी बाळगून आहेत. दरम्यान मृग नक्षत्रातील आठ दिवस कोरडे गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 21 जून ही मृग नक्षत्राची अखेरची तारीख असून 22 जूनला आद्रा नक्षत्राला सुरवात होणार आहे.

मागील वर्षी उन्हाळ्यातील मुळा व डावा कालव्याच्या लाभक्षेञातील शेती पाण्याचे आवर्तन 9 जूनला पूर्ण झाल्यानंतर धरणाच्या कमांड एरियामध्ये एकाच दिवशी 1 इंच (26 मिलीमीटर) पाऊस झाला होता. तर 1 जुलैला मुळा धरणात नवीन पाणी येण्यास सुरुवात झाली होती. आज शुक्रवारी सायंकाळी मुळा धरणात 5 हजार 83 दशलक्ष घनफुट पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा 583 दशलक्ष घनफुट राहिला आहे. पिण्यासाठी राखीव असलेले मुळा धरणातील हे पाणी 15 जुलै 2019 पर्यंत पुरणार आहे.

दुष्काळाने होरपळत असलेल्या बीड जिल्ह्यातील टँकर पाण्यासाठी राहुरीच्या मुळा धरणावर दाखल झाले आहेत. बीड भागात दैंनदिन 100 टँकर पाण्याची मागणी आहे. मात्र बीड ते राहुरी हे अंतर दुरचे असल्याने दररोज 10 टँकर मुळा धरणातून पाणी उचलुन बीडला जात आहे. तसेच मुळा धरणाच्या जांभळी या बॅकवॉटरला पाणी भरून पारनेर भागातील जनतेची तहान भागविली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या