मिनी महाबळेश्वर दापोली गारठली

सामना प्रतिनिधी । मंडणगड

या वर्षीच्या डिसेंबरअखेर थंडीचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत कमी असून दापोलीचा पारा गुरुवार रोजी १०.२ अंश सेल्सियस इतका खाली घसरला आहे. मिनी महाबळेश्वर म्हणून पर्यटकांमध्ये ओळख असणाऱ्या दापोलीत या वर्षी ऑक्टोबर हीटची जाणीव झालीच नाही. ऑक्टोबरच्या दुसऱया आठवडय़ापर्यंत पाऊस रेंगाळल्याने वातावरणात गारवा जाणवत होता.

पावसानंतर वातावरणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असते मात्र या वर्षी गुलाबी थंडीने वातावरण आल्हाददायक राहिले. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात शेवटच्या आठवडय़ात दापोलीचा पारा घसरण्यास सुरुवात झाली. १४ नोव्हेंबर रोजी किमान तापमान १३.२ अंश सेल्सियस एवढे नीचांकी नोंदले गेले. या आठवडय़ाचे किमान सरासरी तापमान १५.६ अंश सेल्सियस राहिले मात्र यानंतर किमान तापमानात वाढ होत राहिली. डिसेंबर महिन्यात ‘ओखी’ वादळाने किमान तापमानात ५.२ अंश सेल्सियसने वाढ होऊन सरासरी तापमान २२.२ अंश सेल्सियस एवढे नोंदले गेले. मात्र वादळानंतर पुन्हा ७ डिसेंबरपासून किमान तापमान घसरण्यास सुरुवात झाली असून बुधवारी किमान तापमान ११.५ अंश सेल्सियस नोंदले गेले. या वर्षातील थंडीच्या मोसमातील नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत दापोलीचा सरासरी पारा जास्त असला तरी पुढील आठ ते दहा दिवसांत थंडीचा जोर राहण्याची शक्यता आहे. दापोलीत पडत असलेल्या गुलाबी थंडीचा चांगला परिणाम आंबा व काजू या मुख्य उत्पन्न असलेल्या फळबागावर दिसून येणार आहे. दापोलीच्या वातावरणात असाच गारठा कायम राहिल्यास या वर्षी बागायतदारांना सुगीचे दिवस येतील असा जाणकारांचा अंदाज आहे.

गुरुवारी किमान तापमान ११.५ अंश सेल्सियस झाल्याने सकाळी हुडहुडी जाणवत होती. सकाळी शाळेत जाणाऱया विद्यार्थ्यांच्या अंगात स्वेटर घातलेले दिसत होते. पहाटे मुंबईतून येणाऱया चाकरमान्यांना गरम चहासाठी हॉटेल्स गाठण्याची वेळ आली होती.

सद्यस्थितीत केवळ १५ टक्के झाडांना मोहोर आला आहे. थंडीच्या प्रमाणात अशीच वाढ होत गेल्यास आंबा व काजूच्या झाडांना मोहोर येण्यास पोषक वातावरण निर्माण होईल.

– विशाल माने, मंडळ कृषी अधिकारी, कृषी विभाग, दापोली.