नाशिकमध्ये थंडी वाढली

सामना ऑनलाईन । नाशिक

नाशिक जिह्यात गुरुवारी कमालीचा गारठा जाणवत होता. निफाडमध्ये किमान तापमान ८.४, तर नाशिकमध्ये ९.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

ओखी वादळाचा प्रभाव, तसेच ढगाळ वातावरणामुळे यंदा तापमानात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. त्यामुळे सलग काही दिवस कडाक्याची थंडी यंदा पडलेली नाही. नाशिकला आठवडाभरापासून कमाल तापमान २८ ते २९ अंशांदरम्यान स्थिर आहे. मात्र, किमान तापमानात मोठी चढ-उतार दिसून आली. रविवारी, सोमवारी पारा १२ अंशांवर होता, मंगळवारी तो १०वर घसरला, तर काल १३.६ आणि ९.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. निफाडच्या कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात किमान ८.४ तापमान होते. जिह्यात दिवसाही गारवा जाणवत होता.

येत्या चार दिवसात तापमानात पुन्हा वाढ होवून ते १०-११ अंशांदरम्यान स्थिर राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ही थंडी गहू, हरबऱयासाठी पोषक अशी आहे. मात्र, थंडी आणखी वाढल्यास द्राक्षबागा संकटात सापडण्याची भीती आहे.