भाजप वाचाळवीरांची भाषा शरमेने मान खाली घालणारी

सामना प्रतिनिधी । नांदेड

भारतीय जनता पक्षाच्या वाचाळवीरांना कोण आवर घालणार, सत्तेचा माज त्यांना चढला असून, राम कदमांच्या वक्तव्यानंतर हे प्रकार थांबतील असे वाटले होते, मात्र काल खुद्द जबाबदार मंत्र्यांनीच महिलांच्या समोर वापरलेली भाषा शरमेने मान खाली घालणारी असून, ही बाबच संतापजनक असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार डी.पी.सावंत यांनी आज पत्रकारांशी बोलतांना केले.

काल पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी खालच्या पातळीवर भाषा वापरुन संबंध महिलांसमोर केलेले वक्तव्य संतापजनक असल्याचा आरोप माजीमंत्री आमदार डी.पी.सावंत यांनी केला आहे. भाजपाचे राम कदम यांच्या वक्तव्याचे पडसाद थांबत नाहीत तोच काल पुन्हा जबाबदार मंत्री असलेल्या बबनराव लोणीकरांची जीभ घसरली. अधिकाऱ्यांना अत्यंत खालच्या पातळीवर शिवी देवून त्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले. सभागृहात महिला असताना त्यांच्यासमोर केलेले वादग्रस्त वक्तव्य शरमेने मान खाली घालणारे आहे. या वाचाळवीरांना कोणी थांबविणार आहे का? असा सवाल आमदार डी.पी.सावंत यांनी केला. याचाच अर्थ या मंडळींना भारतीय जनता पक्षाचेच समर्थन आहे, असा होतो. ना मुख्यमंत्री त्याबद्दल माफी मागतात ना पक्षाचे अध्यक्ष याबद्दल दिलगिरी व्यक्त करतात. एकापाठोपाठ एक अशी वादग्रस्त वक्तव्य करुन ही मंडळी जनतेच्या संतापाला कारणीभूत ठरत आहेत. आमचे कोणीही वाकडे करु शकत नाही, या अविर्भावात ही मंडळी वागत असून, सत्तेचा माज चढलेली मंडळीच अशा प्रकारची वक्तव्य करु शकतात, अशी भूमिकाही आमदार डी.पी.सावंत यांनी मांडली. त्यांच्यासमवेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद नागेलीकर हेही उपस्थित होते.