शिवसेनेचा दणका! लोअर परळचा पूल पादचाऱ्यांसाठी आजपासून खुला

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोअर परळचा पूल बंद केल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत होती. कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता बंद केलेल्या या पुलामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत होते. अखेर शिवसेनेच्या दणक्यानंतर करी रोड जंक्शन ते लोअर परळ स्थानकाचा मार्ग पादचाऱ्यांसाठी शुक्रवारपासून खुला होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.

लोअर परळचा पूल नक्की किती धोकादायक आहे, पुलावरून पादचाऱ्यांना परवानगी देता येईल का यासाठी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव बुधवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या दालनात पालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी पश्चिम रेल्वे, पालिका आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या पुलाची संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यात करी रोड जंक्शन ते लोअर परळ स्थानकापर्यंतचा मार्ग पादचाऱ्यांसाठी खुला करण्याचा निर्णय रेल्वे, पालिका आणि वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी घेतला. हा पूल करी रोड जंक्शनपर्यंत वाहतूक पोलिसांनी बंद केल्यामुळे पादचाऱ्यांना अतिशय गर्दीतून वाट काढावी लागत होती.

यावेळी विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, आमदार सुनील शिंदे, आमदार अजय चौधरी, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, नगरसेविका किशोरी पेडणेकर, नगरसेविका स्नेहल आंबेकर, शाखाप्रमुख गोपाळ खाडय़े, दीपक बागवे, युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील, पश्चिम रेल्वेचे अधिकारी कन्हैया झा, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे आदी उपस्थित होते.