लोअर परळमध्ये गर्दीचा लोंढा आवरेना

सामना प्रतिनिधी । मुंबई

पूर्वेकडे लालबाग, डिलाईल रोड तर पश्चिमेकडे वेगाने विकसित होऊन बिझीनेस हब म्हणून ओळखले जाणाऱया वरळी, लोअर परळची कॉर्पोरेट गर्दी पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ स्थानकात सकाळ-संध्याकाळ उतरते. पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा एक पादचारी पूल आणि आता पहिल्या फलाटावरून थेट पूर्वेला मॅरॉथॉन इमारतीच्या बाजूलाच उतरणारा पादचारी पूल यामुळे ही गर्दी थोडीशी आवरता येते. पण सकाळी 9 ते 10.30 आणि संध्याकाळी 5.30 ते 8 पर्यंत पूर्व आणि पश्चिमेकडून गर्दीचा लोंढा आवरेनासा होतो. त्यात जुन्या पादचारी पुलाचा उतार धोकादायक आहे.

प्रवाशांसाठी फलाट 3 घातक

फलाट क्रमांक 2 वर उतरून चर्चगेटवर जाताना त्याला लागूनच फलाट क्रमांक 3 आहे. मात्र, तो वापरात नाही. त्यावरून चर्चगेटवरून वसई-विरारकडे जाणाऱया जलद लोकल ये-जा करतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी फक्त हॉर्न वाजवला जातो. प्रवाशाचे लक्ष नसेल तर मात्र तिथे अपघात घडतोच.

सकाळी पिक अवरला पूर्वेकडे पुलावर येताना स्थानकाबाहेर फेरीवाले, टॅक्सीवाले रस्ता अडवून बसल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता येत नाही.
– मोहसीन, घाटकोपर

फलाट 2 व 3 वरचा उतार घातक असून त्याचे रूपांतर पादचारी पुलात केले तर प्रवाशांना सुरक्षितता मिळेल.
– सागर सावंत, डिलाईल रोड