अखिलेश यादव यांना प्रशासनाने विमानतळावर रोखले; कार्यकर्त्यांकडून गोंधळ

सामना ऑनलाईन । लखनौ

अलाहाबाद विद्यापीठात छात्रसंघाच्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे माजी मुख्य़मंत्री अखिलेश यादव सहभागी होणार होते. मात्र, त्यांना प्रशासनाने लखनौ विमानतळावर रोखल्याने समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे पोलीस, प्रशासन आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. अखिलेश यादव यांनी ट्विट करून या घटनेचा निषेध केला आहे. आपल्याला अलाहाबाद विद्यापीठात जाण्यापासून का रोखण्यात आले असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांच्या या ट्विटनंतर मोठ्या संख्यने पक्षाचे कार्यकर्ते विमानतळावर जमा झाले. त्यांनी विमानतळ परिसराला घेराव घालत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घालायला सुरुवात केली. या घटनेमागे भाजपचे कटकारस्थान असल्याचा आरोप अखिलेश यांनी केला आहे.

अखिलेश यांना रोखल्यानंतर वाद वाढत असल्याचे पाहून मुख्यमंत्री योगी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. प्रयागराजमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी अखिलेश यांना विमानतळावरच रोखण्यात आल्याचे योगी यांनी सांगितले. अखिलेश यांना विमानतळावर रोखल्याचे वृत्त समजल्यानंतर अलाहाबाद विद्यापीठात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या घटनेवर ट्विट करत अखिलेश यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. छात्रसंघाच्या कार्यक्रमाला सरकार का घाबरत आहे असा सवाल त्यांनी केला. लखनौ विमानतळावर पोहचल्यावर अखिलेश यांना विमानात चढण्यापासून रोखण्यात आले. पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी विमानाची दारे बंद केली होती. या घटनेनंतर अखिलेश यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. आपल्याला विमानतळावर बंधक बनवण्यात आल्याचे ट्विट त्यांनी केले. छात्रसंघाच्या कार्यक्रमाला सरकार एवढे घाबरले आहे, की आपल्याला रोखण्यात आले आहे. जनता ही दडपशाही सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आपल्याला बंधक केल्याचे ट्विट अखिलेश यांनी केल्यानंतर मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते विमानतळ परिसरात जमा झाले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आपल्याकडे अलाहाबाद विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी असूनही सरकारने दडपशाही करत आपल्याला रोखल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे. वाद वाढत असल्याचे पाहून मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी कायदा सुव्यवस्था रोखण्यासाठी अखिलेश यांना रोखल्याचे सांगितले. समजावादी पक्ष सांप्रदायिक वाद परसवण्यासाठी ओळखला जातो. प्रयाराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे. त्यामुळे अखिलेश यांना रोखण्याची मागणी विद्यापीठाने आणि प्रशासनाने केली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अखिलेश विद्यापीठात गेले असते तर विद्यार्थ्यांच्या गटात हाणामारी होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांना रोखण्यात आल्याचे योगी यांनी सांगितले.

प्रयागराज जिल्हा प्रशासनानेही अखिलेश यादव यांना विद्यापीठातील कार्यक्रमात सहभागी होण्यास मनाई केली आहे. विद्यापीठाच्या मार्गदर्शन समितीने 8 फेब्रुवारीला घेतलेल्या निर्णयानुसार राजकीय पक्षांशी संबंधीत व्यक्तींना छात्रसंघाच्या कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही असे स्पष्ट केले होते. या घटनेमागे भाजपचे संकुचित राजकारण असल्याचा आरोप अखिलेश यांनी केला आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रानंतर आता भाजप विद्यापीठांना राजकारणाचे केंद्र बनवत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. बसपा अध्यक्ष मायावती यांनीही या घटनेचा निषेध केला असून सपा-बसपा महाआघाडीला भाजप घाबरला असून ते कटकारस्थान करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या